सहकार ही केवळ एक संकल्पना नसून, ग्रामीण भागाच्या विकासाची ती खरी जीवनवाहिनी आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध करत संगमनेर तालुक्यातील राजहंस सहकारी दूध संघाने सहकार बळकटीकरण आणि पारदर्शक कारभाराची एक नवी दिशा आखली आहे. अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली ‘तालुक्याचा सहकार टिकवण्यासाठी सहकाराची प्रतिज्ञा’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली, ज्यात दूध उत्पादक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सहकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राजहंस दूध संघाच्या वतीने ‘प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी’ या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहकाराची मूळ मूल्ये पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आणि सर्वांनी एकजुटीने, सहकार्याच्या भावनेने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील सर्व गावांतील दूध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि हजारो दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सहकाराचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “सहकारी संस्थांमध्ये राजकारण नव्हे, तर पारदर्शकता आणि विश्वास यांचा मजबूत पाया असावा. या संस्था टिकल्या पाहिजेत, कारण त्या आपल्या सर्वांच्या अस्तित्वाशी आणि समृद्धीशी थेट जोडलेल्या आहेत.”
.
त्यांनी पुढील उद्दिष्टे स्पष्ट केली: दूध संकलन वाढवणे, गुणवत्तापूर्ण दूध निर्मिती करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि एकनिष्ठ कार्यपद्धती अवलंबणे. राजहंस दूध संघाची ही यशस्वी वाटचाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली सुरू झाली असून, आज हा संघ केवळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर एक आदर्श म्हणून ओळखला जातो, असेही देशमुख यांनी नमूद केले. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढवणे आणि ग्रामीण विकास साधणे, हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस, उपस्थित सर्व दूध उत्पादक आणि कार्यकर्त्यांनी “सहकारातून समृद्धीकडे वाटचाल” हा नवा मंत्र मोठ्या एकजुटीने उच्चारला, ज्यामुळे एकात्मतेची आणि सामूहिकतेची भावना अधिक दृढ झाली. अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राजहंस दूध संघाने सहकाराला एक नवी झळाळी दिली आहे आणि ही ‘सहकाराची प्रतिज्ञा’ केवळ शब्दांत न राहता, ती कृतीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकाराची प्रतिज्ञा – नवा संकल्प, नवी दिशा: यावेळी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे खालीलप्रमाणे ‘सहकाराची प्रतिज्ञा’ घेतली:
“मी प्रतिज्ञा करतो की, सहकार सक्षम करण्याकरिता मी एकनिष्ठपणे काम करीन. सहकाराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. दूध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ, ताजे आणि शुद्ध दूध निर्मितीचा प्रसार व प्रचार करीन. गुणवत्तापूर्ण दूध वाढीसाठी प्रयत्न करून माझ्या दूध संघास पुरवठा करीन. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक कारभार राबवीन आणि सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी मंडळाच्या साथीने निष्ठापूर्वक कार्य करीन.”
ही प्रतिज्ञा ग्रामीण महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला एक नवी ऊर्जा देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे