जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्याची वेळ; केतन लव्हाटे यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
आश्वी । झुंझार न्यूज
जिल्ह्यात सध्या बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून, रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखे झाले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आणि रात्रीच्या अंधारातील धोक्यांमुळे शेती पंपाचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करण्यात यावा, अशी मागणी संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथील युवा शेतकरी केतन अरुण लव्हाटे यांनी महावितरणकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बाभळेश्वर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या या सविस्तर निवेदनात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. सध्या महावितरणकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. मात्र, हा नियम आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू लागला आहे.
बिबट्याची दहशत आणि शेतकऱ्यांची असहायता निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर आणि बाभळेश्वर व परिसरात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुले आणि शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने, स्वसंरक्षणासाठी नवीन उपाययोजना करणे किंवा खर्च करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे.
सर्पदंश आणि अपघाताचा धोका
केवळ वन्यप्राणीच नव्हे, तर रात्रीच्या वेळी शेतात साप, विंचू यांसारख्या विषारी कीटकांचाही मोठा वावर असतो. अंधारात काम करताना सर्पदंश होणे, अपघात होणे, तसेच जनावरांचे हल्ले किंवा चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘मानवाधिकार’ समजून विचार करण्याची विनंती केतन लव्हाटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “रात्रीच्या वेळेत होणारा वीजपुरवठा थांबवून तो दिवसा करण्यात यावा, ही आमची विनंती नसून ती आता गरज बनली आहे. या मागणीकडे प्रशासनाने एक ‘मानवाधिकार’ म्हणून पाहावे. शेतकऱ्यांच्या जीविताचे रक्षण करणे हे सरकार आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे.
वरिष्ठ स्तरावर निवेदनाच्या प्रती
सदर मागणीची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या जीवाला धोका कायम राहणार आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ई-मेल तसेच रजिस्टर पोस्टद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.
वीज वितरण कंपनी आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करून दिलासा देते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.