३ डिसेंबर: जागतिक अपंग दिनानिमित्त विशेष 

कोपरगाव । झुंझार न्यूज

शारीरिक व्यंग हे कमकुवतपणाचे लक्षण नसून मनाची जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, हे कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील एका दांपत्याने सिद्ध केले आहे. ५७ टक्के पायाने अधू असलेले भाऊसाहेब पारखे आणि १०० टक्के अंधत्व असलेल्या त्यांच्या पत्नी अनिता पारखे… नियतीने त्यांच्या वाट्याला अपंगत्व दिले असले तरी, या अपंगत्वाचे कोणतेही भावनिक भांडवल न करता, लाचारी न पत्करता, केवळ कष्टाच्या आणि स्वाभिमानाच्या जोरावर हे दांपत्य आपल्या संसाराचा गाडा समर्थपणे ओढत आहे.


चांदेकसारे येथील ४१ वर्षीय भाऊसाहेब पारखे हे पायाने अधू आहेत, तर त्यांच्या पत्नी अनिता यांना डोळ्यांनी दिसत नाही. मात्र, ही कष्टाळू जोडी समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठरली आहे. भाऊसाहेब यांच्या हातात अन्नाची चव उत्तम आहे. त्यांनी शिर्डी येथील अनेक नामांकित हॉटेल्समध्ये शाकाहारी व मांसाहारी स्वयंपाकी (कूक) म्हणून काम केले आहे. त्यांच्या हाताला चव असूनही, पायाच्या व्यंगामुळे दररोज १० किलोमीटर प्रवास करून कामावर जाणे त्यांना जिकिरीचे होऊ लागले. त्यामुळे त्यांनी गावातच छोटे हॉटेल सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु भांडवलाचा अभाव आणि वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला.

 

पाचवीला पुजलेला संघर्ष आणि नियतीचे आघात

या जोडीचा जीवनप्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. भाऊसाहेब लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले, तर अनिता यांच्याही वडिलांचे लहानपणीच निधन झाले. अनिताच्या आईने पोटाची खळगी भरण्यासाठी परभणीवरून नाशिक गाठले. अशा परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी पुढाकार घेऊन भाऊसाहेब आणि अनिता यांचा विवाह लावून दिला.

लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात सायली ही मुलगी आली. आज ती १२ वर्षांची असून इयत्ता सहावीत शिकत आहे. दुर्दैवाने, सायलीला लहानपणापासून पोटाचा त्रास असून तिला अल्सरचे निदान झाले आहे, ज्याचे उपचार नाशिक येथे सुरू आहेत. यानंतर अनिता दुसऱ्यांदा गरोदर राहिल्या, सातव्या महिन्यात त्यांची प्रसूती झाली व मुलगा झाला. म्हातारपणाचा आधार जन्माला आला म्हणून हे दांपत्य आनंदी होते, परंतु अपूर्ण वाढीमुळे काही क्षणातच तो बाळ दगावला आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

संकटांची मालिका आणि स्वाभिमानी बाणा

मुलाच्या निधनानंतर अनिता यांना पित्ताशयाचा त्रास उद्भवला. दोन महिने रुग्णालयात दाखल राहून शस्त्रक्रिया करावी लागली. अनिता यांच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुन्हा बाळ न होऊ देण्याचा सल्ला दिला आहे. दुःखाची साखळी इथेच थांबली नाही, तर अनिता यांचा माहेरचा एकमेव आधार असलेल्या त्यांच्या आईचेही निधन झाले, ज्यामुळे माहेरचाही आसरा संपला.

आज भाऊसाहेब यांच्यावर ६० वर्षीय वृद्ध व कर्णबधिर आईची, पत्नीची आणि आजारी मुलीची जबाबदारी आहे. उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नाही. शासनाकडून मिळणारे अपंगांचे तुटपुंजे मानधन आणि मिळेल ती मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहे. स्वतःच्या व्यंगावर मात करत, कुणापुढेही हात न पसरता स्वाभिमानाने जगणारे हे दांपत्य आजच्या काळात धडधाकट माणसांनाही संकटांशी लढण्याची प्रेरणा देत आहे.

 

“समाजाच्या मदतीची आणि आदराची गरज”

मी जेव्हा भाऊसाहेब आणि अनिताचे लग्न जमवले, तेव्हाच मला खात्री होती की हे दोघे येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करतील. आज ही जोडी ज्या जिद्दीने परिस्थितीशी झगडत आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. भाऊसाहेब पायाने अधू असूनही शारीरिक कष्टाची कामे करतात, तर अनिता अंध असूनही संसारात खंबीर साथ देतात. मात्र, सततचे आजारपण आणि औषधोपचाराचा खर्च यामुळे त्यांची ओढताण होत आहे. माझी समाजाला विनंती आहे की, त्यांच्या व्यंगावर टीका न करता त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. तसेच, दानशूर व्यक्ती व संस्थांनी या स्वाभिमानी कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा.

– अरुण खरात (सामाजिक कार्यकर्ते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed