चार पिढ्यांची जनसेवेची परंपरा जपणारा विखे परिवार !
वाढदिवसाच्या भपक्याला फाटा देत ११० ऊसतोड कामगार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप
आश्वी । झुंझार न्यूज
शिर्डी मतदारसंघात विखे परिवाराने चार पिढ्यांपासून जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणे जनसेवा जपत ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, किसान विकास आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा मजबूत केली आहे. या जनसेवेच्या परंपरेचे खरे वारसदार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील हे आजच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयराव म्हसे यांनी केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च आणि फ्लेक्स बाजीला फाटा देत संचालक विजयराव म्हसे यांच्या संकल्पनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. डॉ. सुजयदादा युवा मंच व आश्वी जनसेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आश्वी गटातील शिबलापूर, आश्वी खुर्द, दाढ खुर्द, आश्वी बुद्रुक, प्रतापपुर तसेच चिचपूर येथील ११० ऊसतोड कामगार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला.
यावेळी बोलताना विजयराव म्हसे म्हणाले की, “विखे परिवाराने नेहमीच लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवले आहे. डॉ. सुजय विखे तरुणांच्या शिक्षण, करिअर, रोजगार आणि प्रगतीसाठी सातत्याने काम करत आहेत. सामान्य, कष्टकरी शेतकरी आणि कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते पदावर असोत वा नसोत, ते नेहमीच धावून जातात. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा निर्धार हीच त्यांची खरी ओळख आहे.
यावेळी माजी संचालक आण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, शिर्डी मतदारसंघात विखे परिवाराने चार पिढ्यांपासून समाजकारण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विकासात अमूल्य योगदान दिले आहे. ग्रामीण भागाच्या विकासात विखे परिवाराचे हे योगदान आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेले जात आहे.
कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “कारखान्यात गेल्या दहा दिवसांत तब्बल एक लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस हे शाश्वत आणि हमखास उत्पादन देणारे पीक असून शेतकऱ्यांनी त्याची लागवड वाढवावी. वाढदिवसानिमित्त राबवलेला ‘आनंदाचा शिधा’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मी देखील माझ्या गटात हा उपक्रम राबवणार आहे.
अॅड. रोहिणी निघुते म्हणाल्या की, “वाढदिवसाच्या नावाखाली लागणारे फ्लेक्स आणि जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा प्रत्यक्ष गरजूंना मदत करणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. ऊसतोड कामगारांसाठी शिधावाटपाची ही संकल्पना इतरांसाठीही आदर्शवत आहे.
आनंदाचा शिधा मिळाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव स्पष्ट दिसत होता .
या कार्यक्रमास कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे, माजी संचालक आण्णासाहेब म्हस्के, संचालक रामप्रसाद मगर, जेहूर शेख, अॅड. रोहिणी निघुते, संचालक अजयराव ब्राम्हणे, युवानेते अजित म्हस्के, मच्छिंद्र ताजणे, विनायक बालोटे, कारभारी म्हसे, संचालक संजय गांधी, प्रकाश शिंदे, अशोकराव म्हसे, डॉ. शंकरराव निघुते, हरीभाऊ ताजणे, तबाजी मुन्तोडे, संतोष मुढे, अशोक वालझाडे, वैभव ताजणे, बाळासाहेब सांगळे, अभिजीत म्हसे, सुभाष होडगर, अनिल म्हसे, नारायण म्हसे, जलदूत विजय म्हसे, प्राचार्य महेश हाळनोर, अनिल गायकवाड, दीपक सोनवणे, किरण गायकवाड आदींसह ग्रामस्थ व ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.