दाढ खुर्द येथील नारळी हरिनाम सप्ताहाने रचला ‘भूतो न भविष्यती’ आदर्श !
दाढ खुर्द । झुंझार न्यूज
विखे पाटील परिवाराचा आणि अध्यात्माचा संबंध हा आजचा नसून गेल्या चार पिढ्यांपासून चालत आलेला आहे. दाढ खुर्द ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भक्ती, सेवा, संस्कृती आणि एकतेचा ‘भूतो न भविष्यती’ असा आदर्श आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे ब्रम्हलीन सद्गुरू माणिकगिरीजी महाराज व बिरोबा महाराजांच्या आशीर्वादाने १९ व्या अखंड नारळी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
भक्तीचा महासागर आणि लाखो भाविकांचा सहभाग
यंदाचा १९ वा नारळी हरिनाम सप्ताह हा खऱ्या अर्थाने भक्तीचा महासागर ठरला. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत चाललेल्या या सप्ताहात जवळपास एक लाख भाविकांनी हजेरी लावली. आठवडाभर चाललेल्या या महोत्सवात संतदर्शन, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची रीघ लागली होती. तर काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली, त्यावेळी एकाच दिवशी सुमारे ३० हजार भाविक उपस्थित होते. दाढ खुर्द नगरीत निर्माण झालेले हे भक्तीमय वातावरण पाहून उपस्थित प्रत्येकजण भारावून गेला होता.
शालिनीताई विखे पाटील मंत्रमुग्ध
सप्ताहादरम्यान सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विशेष भेट दिली. येथील सात्विक आणि भक्तीमय वातावरण पाहून त्या भारावून गेल्या. त्यांनी तब्बल दोन तास शांतचित्ताने बसून कीर्तनाचा आनंद घेतला व त्या वातावरणात मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.
गावकऱ्यांचे कौतुक करताना शालिनीताई म्हणाल्या, “दाढ खुर्द ग्रामस्थांनी केलेले नियोजन आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. गावकऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. वारकरी संप्रदायाची पताका अशीच विस्तारत राहावी, हीच आमची भावना आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून भक्ती आणि सामाजिक एकतेचा एक वेगळा वस्तुपाठ या गावाने घालून दिला आहे.
यावेळी विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि नियोजनाचे विशेष अभिनंदन केले. संपूर्ण सप्ताह काळात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वारकरी संप्रदायाचा जयघोष यामुळे दाढ खुर्द परिसर दुमदुमून गेला होता.