बाळ सुखरूप ; वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील रुपाली विठ्ठल गोधडे (वय २१) या तरुण महिलेचा बाळंतपणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अकोले येथील एका खासगी रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती अचानक बिघडली व बेशुद्ध अवस्थेत तिचा मृत्यू झाला. मात्र तिचे नवजात बाळ सुदैवाने सुखरूप आहे.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली गोधडे यांचे माहेर अकोले येथे असल्याने गर्भावस्थेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर व पोटात वेदना सुरू झाल्याने तिची आई अलका दत्तात्रय सोनवणे यांनी तिला अकोले येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगून शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेद्वारे बाळाचा जन्म सुखरूप झाला; मात्र त्यानंतर रुपालीची प्रकृती अचानक खालावली व ती बेशुद्ध झाली.

 

स्थिती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

 

शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा रुपालीच्या सासरी आश्वी खुर्द येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळंतपणासारख्या आनंदाच्या क्षणी तरुण विवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

दरम्यान, रुपालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी अकोले येथील खासगी रुग्णालय व संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

रुपालीचे सासर व माहेर दोन्ही कुटुंबे अत्यंत गरीब असून ती आदिवासी समाजातील आहे. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. हा प्रसंग अत्यंत वेदनादायक व माणुसकीला हादरवणारा ठरला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *