आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर-शिबलापूर रस्त्यावरील जाखुरी शिवारात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका १८ वर्षीय तरुणाची प्राणज्योत अखेर मालवली आहे. गौरव राम शेळके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, गेल्या पाच महिन्यांपासून तो मृत्यूशी दोन हात करत होता. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न आणि कुटुंबाची प्रार्थना अपयशी ठरली. ऐन उमेदीच्या काळात गौरवचा मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यासह पानोडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

पाच महिन्यांपूर्वी गौरव शेळके हा संगमनेर-शिबलापूर मार्गावरून जात असताना जाखुरी शिवारात त्याच्या दुचाकीला भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की, गौरवच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौरवला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता.

गौरव आपल्या कुटुंबाचा आधार होता. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील आणि नातेवाईकांनी कोणतीही कसर सोडली नाही. नाशिक आणि संगमनेर येथील नामांकित रुग्णालयांमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. गौरवच्या उपचारांसाठी अत्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या या कुटुंबाने गेल्या पाच महिन्यात सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्च केले. ‘पैसा गेला तरी चालेल, पण मुलगा परत यावा’ याच आशेने कुटुंबाने सर्वस्व पणाला लावले होते. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते.
गेल्या पाच महिन्यांपासून गौरव हॉस्पिटलच्या बेडवर निपचित पडून होता. तो उपचाराला प्रतिसाद देऊन पुन्हा घरी परतेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, शुक्रवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. गौरवच्या निधनाची बातमी समजताच पानोडी गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली.

शुक्रवारी रात्री उशिरा गौरववर पानोडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या १८ वर्षांच्या तरुणाला निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
गौरवच्या अपघाती मृत्यूमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. एका तरुणाचा बळी आणि एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची झालेली आर्थिक व मानसिक वाताहत समाजाला विचार करायला लावणारी आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, शेळके कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात संपूर्ण तालुका सहभागी झाला आहे.
