दि. १६ डिसेंबर २०२५ रोजीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने स्वाभिमान धम्मभूमी हरेगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बौद्ध समाजाने “महाधम्मधर” ही मानाची उपाधी प्रदान करून मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
हा कार्यक्रम स्वाभिमान धम्मभूमी हरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित बौद्ध अनुयायांनी बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, समता आणि बौद्ध धम्म पुनर्जीवित करण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून भिमराव आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष म्हणून प्रेरणादायी कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “महाधम्मधर” उपाधी ही भिमराव आंबेडकर यांना बौद्ध महासभेच्या कार्यात दिलेल्या महान योगदानाची ओळख आहे.
कार्यक्रमात बौद्ध महासभेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲड सुभाष जौंजाळे,ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड एस के भंडारे,ट्रस्टी डॉ. राजाराम बडवे,राज्याचे अध्यक्ष यु. जी.बोराडे,सरचिटणीस अशोक केदारे, राज्य उपाध्यक्ष उत्तम मगरे ,नाशिक विभाग प्रभारी/राज्य संघटक गौरव पवार ,तसेच प्रमुख मान्यवर उपस्थिती होते. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हा तालुका शहर व ग्राम शाखा कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात महिला शाखा पदाधिकारी सह नागरिकांची उपस्थिती होती.
भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनपर मनोगतानंतर, सदरचे ऐतिहासिक मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मानपत्राचे वाचन अनिल मुन्तोडे यांनी केले.
हरेगावसारख्या स्वाभिमान धम्मभूमीत भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांचा असा गौरव करणे ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग आहे.
हा सन्मान कार्यक्रम बौद्ध अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरला असून, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसारासह धम्म चळवळ अधिक गतिमान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. समता सैनिक दलाचे संरक्षण उपाध्यक्ष इंजि. अतिष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखालील शिस्तबद्ध संचलनाद्वारे भीमराव यशवंतराव आंबेडकरसाहेबांना मानवंदना दिली.
हरेगाव येथील स्वाभिमान धम्मपरिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहिले होते. १६ डिसेंबर १९३९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीत अन्यायाविरुद्ध लढण्याचा मंत्र दिला होता. त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर होते. सूत्रसंचालन नरेंद्र पवार, गौतम पगारे व संतोष बनसोडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय जगताप व बिपीन गायकवाड यांनी केले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थानिक महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.