संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या स्मृतीप्रयर्थ आयोजित फिरता १९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात झाली. सप्ताहाच्या सांगतेनंतर आयोजित ‘ध्वज उतरविण्याच्या’ कार्यक्रमात सुध्दा भाविकांची मोठी गर्दी दिसून आली परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचे अचूक नियोजन आणि शिस्त पाहून या सप्ताहाला “कोहिनूर सप्ताह” अशी उपाधी दिली. “गादी ही महाराजांचा शब्द असते आणि तो शब्द कधीही खोटा ठरत नाही, तो यशस्वी होतोच,” अशा शब्दांत दत्तगिरी महाराजांनी या सोहळ्याचे कौतुक केले.
यावर्षीच्या सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावकऱ्यांनी दाखविलेली एकजूट. दाढ खुर्द ग्रामस्थांनी सप्ताहासाठी तब्बल २७ लाख रुपयांचे योगदान दिले, तर बाहेरील परिसरातून १६ लाख रुपयांचा निधी जमा झाला. सप्ताहातील पंगती, व्यवस्था आणि इतर खर्चासाठी मिळालेला हा ४३ लाखांचा निधी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक मानला जात आहे. महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
ध्वज उतरविण्याच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना दत्तगिरी महाराज यांनी जीवनाचे तत्वज्ञान मांडले. ते म्हणाले की, “कोणत्याही कार्याची पावती संघर्षातूनच मिळते. आयुष्यात निंदक किंवा विरोधक असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याप्रमाणे सासू नसेल तर सुनेला घराचा नीट आकार येत नाही, त्याचप्रमाणे कट्टर विरोधकामुळेच कार्यकर्ता अधिक धडपडणारा आणि सक्षम होतो. विरोधकांमुळेच व्यक्तीच्या कर्तृत्वाला पैलू पडतात.
आजच्या राजकारणावर टिप्पणी करताना महाराज म्हणाले, “साधू-संन्याशाला खुर्ची किंवा गादीची हाव नसते, तर सेवा आणि श्रद्धा हीच त्यांची संपत्ती असते. दुर्दैवाने आज निष्काम प्रेम करणाऱ्यांपेक्षा व्यावहारिक लोकांचीच गर्दी अधिक दिसते.” त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, “धर्माचे राजसत्तेवर नियंत्रण असणे आवश्यक आहे, कारण तरच समाजात सेवातत्व टिकून राहील.” बुद्धी स्थिर ठेवून भक्तीची ओढ लागणे हाच सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, नारायण काका कहार, भारतराव गीते, निवृत्ती सांगळे, प्रमोद बोंद्रे, सतिष जोशी, किशोर जोशी, सुनील जोशी, डॉ. साईनाथ जोशी, संजय जोशी, अशोक महाराज जोशी, विठ्ठल आसावा, मुकुंद महाराज जोरी , गोरक्षनाथ तांबे, उत्तम कुदनर यांसह परिसरातील कार्यकर्ते , पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जोशी यांनी केले, तर विलास जोशी यांनी सप्ताहाच्या जमा-खर्चाचा पारदर्शक तपशील उपस्थितांसमोर मांडला. पडद्यामागे काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवकांच्या निष्ठेमुळेच १९ व्या वर्षाचा हा ‘कोहिनूर’ सप्ताह यशस्वी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.