अहिल्यानगर । झुंझार न्यूज 

पुरस्कार हे कार्याला प्रेरणा देतात आणि याच प्रेरणेतून राष्ट्र मोठे होते,” असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. नगर वाचनालय, अहमदनगर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील समाजसेवक भारत अंबादास शेवाळे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) या संस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२५’ पार पडले. या सोहळ्याचे नेटके नियोजन समारंभ समन्वयक ॲड. कृष्णाजी जगदाळे यांनी केले होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

भारत अंबादास शेवाळे (रा. पानोडी, ता. संगमनेर) हे पानोडी व परिसरात एक धडपडणारे समाजसेवक म्हणून परिचित आहेत. गोरगरीब जनतेसाठी सातत्याने विविध शासकीय योजना राबवणे, गरजू लोकांना नागरी सुविधा मिळवून देणे आणि सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवणे, या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अतिशय सन्मानपूर्वक पार पडलेल्या या सोहळ्यात भारत शेवाळे यांना आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.

भारत शेवाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समजताच पानोडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पानोडी गावचे सरपंच गणपत हजारे , राजहंस दूध संघाचे संचालक तथा उपसरपंच विक्रमराजे थोरात , संगमनेर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दिलिपराव पुंड  तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी , तरुणांनी व  ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “भारत शेवाळे यांच्या कार्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

 

या पुरस्कारामुळे भारत शेवाळे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *