आश्वी । झुंझार न्यूज

श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम साधणारा १७ वा श्री साईसच्चरित पारायण सोहळा तसेच भव्य संगीतमय देवी भागवत कथेचा दाढ बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान व समस्त दाढ बु. ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसर ‘साईमय’ झाला असून, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे मंगलमय वातावरणात श्री साईबाबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या श्री साईसच्चरित ग्रंथाच्या सामूहिक पारायणाला प्रारंभ झाला असून, दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत शेकडो भाविक या पारायणात सहभागी होत आहेत. या पारायणाची सांगता गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दररोज सायंकाळी होणारी ‘संगीतमय देवी भागवत कथा’. सुप्रसिद्ध रामायणाचार्य, भागवताचार्य व शिवकथाकार ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे यांच्या सुमधुर आणि ओघवत्या वाणीतून ही कथा सादर होत आहे. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत कथा पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी सोनालीताईंनी आपल्या निरूपणातून देवी महात्म्य, संस्कारांची जपणूक आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी आयोजित केलेला विशेष कार्यक्रम. रात्री ९ ते १२ या वेळेत भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या गजरात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत अध्यात्मिक वातावरणात नववर्ष साजरे करण्याचा हा उपक्रम परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

हा संपूर्ण सोहळा श्री हनुमान व श्री अदणमदन बाबा मंदिरालगतच्या प्रशस्त प्रांगणात पार पडत आहे. कथेनंतर दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, युवक-युवती आणि स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत

गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मान्यवर कीर्तनकारांच्या उपस्थितीत ‘काल्याचे कीर्तन’ होईल आणि त्यानंतर महाप्रसादाने या मंगलमय सोहळ्याची सांगता होणार आहे.

दाढ बुद्रुक आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्याचा, पारायणाचा आणि देवी भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *