लोणी । झुंझार न्यूज
वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याची समस्या भविष्यात मोठे आव्हान ठरणार आहे. अशा परिस्थितीत लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने गोगलगाव येथे विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यातील विकसित होत असलेल्या गावांसाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा तथा महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गोगलगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या या भव्य घनकचरा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (दि. २८) ना. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, चेअरमन नंदूशेठ राठी, व्हा. चेअरमन सोपान शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, सरपंच कल्पना मैड, दत्तात्रय राजभोज, भाऊसाहेब खाडे, अनिल विखे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

४ कोटींचा देशातील पथदर्शी प्रकल्प
सुमारे चार कोटी रुपये खर्चून उभारलेला हा अत्याधुनिक प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर राबवला जाणारा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापनाचा इतका मोठा आणि यशस्वी प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत ना. विखे पाटील यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. तंत्रज्ञानाची जोड देऊन हा प्रकल्प उभारला असून, तो अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

लोणी ग्रामपंचायतीचा नावलौकिक
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने नेहमीच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने राज्य आणि देश पातळीवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत, हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी गावातील सुसज्ज मटण मार्केटचे कौतुक केले, तसेच गावात दोन एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

शेतकऱ्यांना स्वस्त खत मिळणार : डॉ. सुजय विखे पाटील
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, या प्रकल्पाचा स्थानिक नागरिकांना किंवा परिसरातील गावांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांकडून गोळा केलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. या प्रक्रियेतून तयार होणारे सेंद्रिय खत स्थानिक शेतकऱ्यांना अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिले जाईल. तसेच कचरा संकलन आणि प्रक्रियेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
