संगमनेर तालुक्यात गेल्या ४० वर्षांच्या काळात जी कामे होऊ शकली नाहीत, ती महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ एका वर्षात पूर्ण झाली आहेत. भविष्यात तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिक क्रांती घडवण्याचा आमचा मानस आहे. स्थानिकांनी उद्योगांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, तालुक्यात मोठे उद्योग आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो,” अशी ग्वाही राज्याचे महसूल, जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील पिंपरणे येथे सुमारे ८ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ ना. विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत पार पडला. बापूसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गोकूळ दिघे , संदिप घुगे , संतोष रोहोम , मंजाबापू साळवे आदीसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “राज्यातील महायुती सरकार विकासाच्या ध्येयाने काम करत आहे. या प्रक्रियेत संगमनेर तालुका कुठेही मागे पडणार नाही याची खबरदारी आमदार अमोल खताळ घेत आहेत. ते सातत्याने पाठपुरावा करून निधी खेचून आणत आहेत. कामाचे श्रेय कोण घेते यापेक्षा काम नक्की कोण करत आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. कितीही फ्लेक्सबाजी केली तरी तालुक्यातील जनतेच्या मनात केवळ महायुतीच आहे.
रेल्वे संगमनेरमार्गेच नेणार; विखे पाटलांचा निर्धार
पुणे-नासिक रेल्वे प्रकल्पावरून विरोधकांवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, “तालुक्यात सध्या कोणाचे इंजिन कोणत्या डब्याला जोडले आहे, हेच समजत नाहीये. रेल्वे पळवल्याचे आरोप करणाऱ्यांनी आधी हे सांगावे की कोणाच्या काळात हा प्रकल्प बदलला गेला? मी आजही पुणे-नासिक रेल्वे संगमनेर मार्गेच नेण्याच्या मागणीवर ठाम आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहे.
तालुका सुजलाम् सुफलाम् करणार
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पात संगमनेरला ‘पाणीदार’ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “निळवंडे धरणामुळे वर्षानुवर्षे दुष्काळ सोसणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून, भोजापूर चारीसाठी ४४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच भंडारदरा धरणाची साठवण क्षमता वाढवून वंचित गावांना न्याय देण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आमदार अमोल खताळ यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “सामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाला हे काहींना पचत नाहीये. त्यामुळेच वैयक्तिक बदनामी करून कामात अडथळे आणले जात आहेत. पण जनता माझ्या पाठीशी आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून विजय मिळवला असला तरी आम्ही खचलो नाही. तिसऱ्याच दिवसापासून आम्ही जनतेच्या सेवेत हजर झालो. विधानसभेला जसा इतिहास घडवला, तसाच पुनरावृत्ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनता घडवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.