संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेरच्या राजकारणात आज एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. उत्साहाचे वातावरण, ऐतिहासिक मिरवणूक आणि संकल्प… पाहुयात या सोहळ्याचा विशेष वृत्तांत!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून विजयाचा शंखनाद करण्यात आला. ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली.


 

प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनात डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. यावेळी राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे आणि जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की , “स्वच्छता, बंधुभाव आणि विकास ही संगमनेरची संस्कृती आहे. हा विजय जनतेचा आहे. १९९१ पासूनची विकासाची परंपरा डॉ. मैथिलीताईंच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षमपणे पुढे जाईल. शहराच्या आनंदासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.”


 

यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर २.०’ चा नवा संकल्प मांडत म्हणाले की , “आम्ही संगमनेरला देशात आदर्श बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. जन्म-मृत्यूचे दाखले आता घरपोच मिळतील. प्रशासनात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही आणि प्रत्येक नगरसेवकाचा कार्य अहवाल जनतेसमोर मांडला जाईल.”

 

नगराध्यक्ष पदाची सुत्र स्विकारत डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की , “जनतेने जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थ ठरवेन. कोणताही भेदभाव न करता, सर्वांना सोबत घेऊन संगमनेरच्या विकासासाठी आम्ही ‘टीम सेवा समिती’ म्हणून काम करू.”


 

या सोहळ्याला संगमनेरमधील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सेवा समिती’च्या माध्यमातून आता संगमनेर शहराचा चेहरामोहरा कसा बदलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed