श्रमसंस्कार शिबिरातून राबविले विविध उपक्रम; मंदिर परिसर, स्मशानभूमी स्वच्छता आणि बंधारे बांधकामावर भर

आश्वी । झुंझार न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ (ता. राहुरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे’ श्रीक्षेत्र तांभेरे येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. सर्जेराव मते पाटील यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता, या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावात विविध सामाजिक आणि कृतीशील उपक्रम राबवून स्वच्छतेचा व श्रमदानाचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

शिबिराच्या निमित्ताने तांभेरे गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी जनजागृती रॅली काढली. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात केली. यामध्ये श्रीक्षेत्र तांभेरे येथील श्रीराम मंदिर व मोरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्मशानभूमी व दशक्रिया विधी घाट परिसरातील झाडे-झुडपे काढून परिसर चकाचक केला. गावातील नवीन ग्रामसचिवालयासमोर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यासोबतच दलित दफनभूमी व तांभेरे-कोल्हार चौक परिसराची स्वच्छता करण्यात आली.

जलसंधारणाचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत कृतीशील बंधारे बांधले. याशिवाय, गावातील प्रसिद्ध “धिंगाण्या बैल” याला आगळावेगळा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांनी प्राण्यांप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त केली.

उद्घाटक म्हणून बोलताना प्रा. सर्जेराव मते पाटील म्हणाले की, “आजच्या तरुणाईमध्ये समाज परिवर्तन घडवून आणण्याची मोठी क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन, अचूकता आणि सचोटी या गुणांचा अंगीकार करावा. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक काम करणे काळाची गरज आहे.” त्यांनी पुढे तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर आणि व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम जन्मोत्सव समितीचे माजी सचिव चंद्रकांत पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मणराव गागरे, माजी सचिव काकासाहेब ढगे, साई गणेश शेतकरी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मुसमाडे उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मणराव आग्रे व दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाचा पुरस्कार प्राप्त ब्लॉगर आदित्य डेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी मेजर ताराचंद गागरे, बाळासाहेब बेलकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बलराज पाटील, सुनील गागरे, पंढरीनाथ शेलार, उत्तम मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, जालिंदर बेलकर, रामदास गागरे, विनोद महाराज मुसमाडे, सोपान शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती आगरकर व डॉ. प्रतिभा विखे यांनी केले, तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप राजभोज यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. आर. डी. बोरसे, डॉ. बी. एन. नवले, प्रा. डी. एन. घाणे, महेंद्र तांबे, ॲड. अनिल गागरे आणि सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *