अहिल्यानगरमध्ये दिमाखदार सोहळा
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द गावचे सरपंच सतिष जोशी यांच्या लोकहितदक्ष कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली आहे. सरपंच सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार’ सतिष जोशी यांना प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अहिल्यानगर येथील कार्यक्रमात उज्जैनचे महंत कालिदास महाराज आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री रुचिता देसाई यांच्या शुभहस्ते जोशी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भारतराव गीते, राजेश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राज्यभरातून आलेले सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दाढ खुर्द गावाचा सर्वांगीण विकास हा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने सुरू आहे. सतिष जोशी यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात गावात अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत. यामध्ये गावाला जोडणारे मुख्य रस्ते, गावांतर्गत सिमेंट रस्ते, आधुनिक स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय, सांडपाण्याचे नियोजन, तलाव पुनरुज्जीवन आणि जलसंधारणाची कामे यांचा समावेश आहे.
याशिवाय दलित वस्ती सुधारणा आणि संपूर्ण गावात स्ट्रीट लाईटचे जाळे निर्माण करून गावाला शहराच्या तोडीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्यमंत्री पंचायत राज आदर्श गाव योजनेच्या दिशेने गावाची वाटचाल सुरू असून, लवकरच राज्य पातळीवरील ‘आदर्श गाव’ म्हणून दाढ खुर्दची निवड होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा सन्मान माझा नव्हे, तर ग्रामस्थांचा – सतिष जोशी
पुरस्काराला उत्तर देताना सरपंच सतिष जोशी म्हणाले की, “मिळालेला हा पुरस्कार म्हणजे गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रामाणिक कामाची पावती आहे. या पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा अधिक वाढली असून जबाबदारीची जाणीवही झाली आहे. हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या समस्त दाढ खुर्द ग्रामस्थांचा आहे.
सतिष जोशी यांच्या या यशाबद्दल जलसंपदा ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खासदार सुजयदादा विखे पाटील तसेच गावातील ग्रामस्थ आणि संगमनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे .




