अहिल्यानगरमध्ये दिमाखदार सोहळा
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील तरुण उद्योजक प्रविण महादू खेडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘आदर्श युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या एका भव्य सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.

राज्यस्तरीय सरपंच सेवा संघाच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रविण खेडकर यांनी अत्यंत कमी वयात उद्योजकता क्षेत्रात मिळवलेले यश आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.

हा पुरस्कार उज्जेनचे महंत कालिदास महाराज आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री रुचिरा देसाई यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते भारतराव गीते, ज्येष्ठ पत्रकार राजेश गायकवाड, रमाकांत पवार, प्रकाश जाधव, सुनील सोनवणे यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महंत कालिदास महाराज यांनी आपल्या आशीर्वादापर भाषणात प्रविण खेडकर यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे कौतुक केले. “ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायात उतरून स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. अभिनेत्री रुचिरा देसाई यांनीही खेडकर यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रविण खेडकर यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्यासह पानोडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सरपंच सेवा संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, खेडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, जी ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना प्रविण खेडकर यांनी सरपंच सेवा संघाचे आभार मानले आणि हा पुरस्कार आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला व सहकाऱ्यांच्या साथीला समर्पित केला.

