भाजपचे आश्वी मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध गौणखनीज आणि विशेषतः वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे शासनाचा महसूल बुडत असून गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे आश्वी मंडल अध्यक्ष श्री. गोकुळ दिघे यांनी संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित माफियांवर व सराईत गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी नदीपात्रातून आणि इतर ठिकाणांहून अवैध रित्या गौणखनिजाचे उत्खनन व तस्करी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब भाजपचे आश्वी मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
वाळू तस्करीच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. अवैध गौणखनीज तस्करांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, तसेच या व्यवसायात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांना चाप लावावा, असे आदेश त्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
पालकमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर गोकुळ दिघे यांनी प्रांताधिकारी, संगमनेर यांना सविस्तर निवेदन देऊन कारवाईची मागणी लावून धरली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “तालुक्यात वाळू माफियांची दहशत वाढत असून प्रशासनाने या माफियांच्या मुसक्या आवळाव्यात. सराईत गुन्हेगारांच्या अवैध कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
या निवेदनाच्या प्रती संगमनेरचे तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यांनाही माहिती व कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या वाळू माफियांवर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.