माजी महापौर सुधाकरराव सोनवणे आणि रंजनाताईंच्या कार्याचा नवा इतिहास
सलग २५ वर्षे जनतेच्या मनावर अधिराज्य
नवी मुंबई : झुंझार न्यूज
जनतेचा विश्वास विकत मिळत नाही, तो कष्टाने आणि निष्ठेने मिळवावा लागतो,” हे ब्रीदवाक्य केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणणारे नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण या छोट्याशा गावातील सोनवणे दांपत्याने नवी मुंबई महानगरपालिकेत आपल्या कर्तृत्वाचा जो डंका वाजवला आहे, त्यामुळे केवळ संगमनेरच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२५ वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि साधी राहणी
सुधाकरराव सोनवणे हे गेल्या २५ वर्षांपासून नवी मुंबईत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. या प्रवासात त्यांनी महापौर, उपमहापौर आणि शिक्षण मंडळ सभापती यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली. सत्तेच्या शिखरावर असूनही सोनवणे आजही झोपडपट्टी परिसरातच वास्तव्यास आहेत. “सत्तेचा कोणताही गर्व शिवला नाही,” हीच त्यांची खरी ओळख आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवताना त्यांनी नेहमीच विकासाला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.
सुधाकरराव सोनवणे यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि खडतर राहिला आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी ‘रोजगार हमी’च्या कामावर गेले. प्रवरा नगर येथे वसतिगृहात राहून गरिबीचे चटके सोसत त्यांनी शिक्षण घेतले. उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठल्यानंतर एका फॅब्रिकेशनच्या दुकानात ‘हेल्पर’ म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. मात्र, आपल्या जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर ते फिटर, कारागीर आणि पुढे एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर बनले. राजस्थान, गुजरात आणि भोपाळपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
राज्यात दलित पँथरची लाट असताना सुधाकरराव या चळवळीत सक्रिय झाले. झोपडपट्टीवासीयांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यांचे हेच लढाऊ नेतृत्व पाहून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांना नवी मुंबईतून निवडणुकीची संधी दिली आणि ते पहिल्याच प्रयत्नात प्रचंड मतांनी निवडून आले. त्यानंतर राज्याचे नेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नवी मुंबईच्या विकासात मोठे योगदान दिले.
शिक्षण आणि पर्यावरणाचे दूत
केवळ रस्ते आणि गटारे म्हणजे विकास नव्हे, तर समाज परिवर्तन हा त्यांचा ध्यास राहिला. शिक्षण मंडळ सभापती असताना त्यांनी ‘डिजिटल शाळा’ आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने बहुभाषिक शाळा सुरू केल्या. आज हजारो गरीब मुले तिथे दर्जेदार शिक्षण घेत आहेत. याशिवाय, १ लाख वृक्षारोपण आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या मोहिमांतून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘आदर्श नागरिक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सुधाकरराव यांच्या यशात त्यांच्या पत्नी सौ. रंजनाताई सोनवणे यांचा मोलाचा वाटा आहे. त्या स्वतः गेल्या १० वर्षांपासून नगरसेविका म्हणून प्रभागात सक्रिय आहेत. तसेच, त्यांच्या कन्या डॉ. गौतमी यांनीही नगरसेविका म्हणून जनतेची सेवा केली आहे. संपूर्ण सोनवणे कुटुंब आजही सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याने जनतेने त्यांना पुन्हा एकदा डोक्यावर घेतले आहे.
संगमनेरच्या मातीतील हा हिरा नवी मुंबईसारख्या महानगरात चमकत असताना, आता त्यांनी राज्य पातळीवर नेतृत्व करावे, अशी अपेक्षा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि संगमनेरकरांकडून व्यक्त होत आहे.
‘सामान्यातील असामान्य माणूस’ सुधाकरराव सोनवणे यांच्या यशाने सिद्ध केले आहे की, जर जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते. रोजगार हमीचे कामे करणारा जेव्हा शहराचा ‘प्रथम नागरिक’ (महापौर) बनतो, तेव्हा तो लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय असतो.