म्हाळुंगी नदीतील कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त दोघांना पकडले आठ फरार

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

संगमनेर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने म्हाळुंगी नदीपात्रातून रिक्षाद्वारे सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली. वाळूतस्करांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले, तर आठ ते दहा जण पथकाला पाहताच उसाच्या शेतात फरार झाले. तर दुसऱ्या कारवाईत रायते शिवारात प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेला पोकलँडद्वारे वाळू उपसा महसूल विभागाच्या विशेष भरारी पथकाने पकडला. पोकलॅण्ड मशीनसह महसूलच्या विशेष भरारी पथकाने वाळूसाठा ही जप्त केला आहे

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदी पात्रातील शांती घाट परिसरात एका काळ्या रंगाच्या रिक्षाद्वारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती संगमनेर येथील तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. माहितीची खात्री करत तहसीलदार मांजरे यांनी स्वतः विशेष भरारी पथकातील ग्राममहसूल अधिकारी सचिन बोरकर, प्रवीण आशुतोष वाकडे, अविष्कार थोरात, वैभव गुंजाळ तसेच पोलीस कर्मचारी खुळे व बेनके यांचे संयुक्त पथक नदी पात्रात दाखल होताच वाळूतस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल व पोलीस पथकाने पाठलाग करत सर्फराज रियाज शेख रा.रहेमत नगर) सलीम झहीर शेख (रा. संगमनेर खुर्द) या दोघांना ताब्यात घेतले. उर्वरित आठ ते दहा संशयित उसाच्या शेतात पळून जाऊन फरार झाले. या कारवाईत सुमारे अडीच ब्रास वाळू (अंदाजे १ हजार ५०० रुपये किंमत) तसेच २५ हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची रिक्षा वाळूसह जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी संगमनेरचे ग्राममहसूल अधिकारी जाफर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आठ ते दहा वाळूतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईत संगमनेर शहरालगत असलेल्या रायते शिवारातील प्रवरा नदीपात्रात पोकलँड मशीनद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ विशेष भरारी पथकाला घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंडळ महसूल अधिकारी मंगल सांगळे, संगीता चतुरे, आरती साठे तसेच ग्राममहसूल अधिकारी संकेत काशीद, मछिंद्र राहणे, अविष्कार थोरात, अनुपमा गांगुरडे, सचिन बोरकर यांच्या पथकाने नदीपात्रात धडक कारवाई करत पोकलँड मशीन पकडले.यावेळी तन्वीर शेख याने नदी पात्रात करून ठेवलेला वाळू साठाही महसूल विभागाने जप्त केला आहे. या संपूर्ण कारवाईचा पंचनामा केला असून वाळू साठा करणाऱ्या तस्करा वर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात शासनाच्या घरकुल योजनेच्या नावाखाली अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे प्रकार समोर आले असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली, तरी तिची कोणतीही गय न करता कठोर कारवाई करावी, अशा सक्त सूचना दिल्या आहे.

संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थाने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाखाली कोणीही गैरफायदा घेऊ नये.

आमदार- अमोल खताळ

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *