रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते महापूजा संपन्न

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर शहराचा ऐतिहासिक वारसा आणि भक्तीचा संगम असलेल्या होलमराजाच्या मानाच्या काठीचे आज श्री क्षेत्र जेजुरीकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. संगमनेर येथील ऐतिहासिक देशमुख वाड्यात राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते या मानाच्या काठीची महापूजा आणि आरती करण्यात आली. ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’ आणि ‘येळकोट येळकोट घेरी’च्या जयघोषात हा पालखी सोहळा वाजत-गाजत मार्गस्थ झाला.
अखंडित ऐतिहासिक परंपरा
संगमनेर परगण्याची जहागीरदारी ऐतिहासिक काळापासून देशमुख कुटुंबाकडे असल्याने, होलमराजाच्या या काठीचा मान परंपरेने देशमुख परिवाराकडेच आहे. विशेष म्हणजे, श्री क्षेत्र जेजुरी येथे या काठीला ‘उजवा मान’ दिला जातो. ही परंपरा अनंत काळापासून सुरू असून ती आजही तितक्याच निष्ठेने जपली जात आहे.
परंपरेनुसार, संगमनेरहून निघणारी ही मानाची काठी प्रथम देशमुख वाड्याच्या बुरुजाला स्पर्श करते. त्यानंतर ही काठी पालखी वाड्यात विसावते. या ठिकाणी तळी-भंडार करून महापूजा व आरती करण्यात येते. आज सकाळी रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते हा विधी पार पडला. यावेळी संपूर्ण देशमुख परिवार आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऐतिहासिक परंपरेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे या पालखी सोहळ्याचे स्वरूप व्यापक झाले असून, शेकडो भाविक भक्त आता संगमनेर ते जेजुरी असा पायी प्रवास करत पालखीसोबत जात आहेत.
पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती आणि प्रथा देशमुख परिवाराने आजही जिवंत ठेवली आहे. आज सकाळी वाजत-गाजत ही काठी शहरातून मार्गस्थ होताना भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आता हा पालखी सोहळा काही दिवसांच्या पायी प्रवासानंतर खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर पोहोचेल.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *