राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित दादा पवार यांचे मंगळवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला या घटनेचे तीव्र पडसाद संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे उमटले असून, गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत ‘गाव बंद’ पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आश्वी बुद्रुक येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा सुरू होण्यापुर्वीचं अजित दादांच्या अपघाती निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी समजताच सभेतील वातावरण अत्यंत गंभीर आणि शोकाकुल झाले. ग्रामसभेच्या वतीने तातडीने शोकप्रस्ताव मांडून अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन ग्रामसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.
या प्रसंगी सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मदने, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दादांच्या कार्याचे स्मरण केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खाजगी विमानाने प्रवास करत होते. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमानाचा भीषण अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत अजित दादांसह विमानातील इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने बंद
अजित दादांच्या निधनामुळे आश्वी परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि छोट्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा शोक व्यक्त केला. “महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्पष्टवक्ता आणि विकासपुरुष म्हणून दादांची ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने राज्याची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे,” अशा शब्दांत लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.