महाराष्ट्राचे दिलदार दमदार नेतृत्व लाडके दादा म्हणजे अजितदादा पवार.त्यांचे अकाली अपघाती निधन हे महाराष्ट्राचे काळीज चिरणारे दुःख ठरले आहे.दिवंगत अजितदादा पवार यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
अजितदादा पवार हे पुरोगामी विचारांचे सर्वधर्मसमभावाचे झुंजार शिलेदार राहिले आहेत.फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख कधीही पुसली जाऊ नये याबाबत वैचारिक बैठक पक्की असणारे नेते अजितदादा पवार होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार हे नाव घेतले की उपमुख्यमंत्री पद ओघानेच येते.अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री पद हे समीकरण महाराष्ट्रात रुढ झालेले आहे.इतक्या वेळा अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.उपमुख्यमंत्री पदाशी अजितदादा पवार यांची नाळ जोडली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार सहा वेळा विराजमान झाले असले तरी त्यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते.महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होण्याचे अजितदादा पवारांचे स्वप्न सध्या पूर्ण होऊ शकत नव्हते.यदा कदाचीत जर अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले असते तर ते कर्तव्य तत्पर,कर्तव्य निष्ठ,लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले असते यात शंका नाही.
अजितदादा पवार यांचा स्वभाव नितळ पाण्यासारखा पारदर्शक शुध्द होता.प्रामाणिक होता,त्यांच्याकडे कोणी ही कोणतेही काम घेऊन गेल्यास ते काम करायचे.मात्र जर काम होण्यासारखे नसेल तर ते होणार नाही असे स्पष्ट सांगायचे.कोणालाही खोटे आश्वासन देऊन ते झुलवत ठेवत नव्हते.ते स्पष्टवक्ते होते.दिलेला शब्द ते पुर्ण करीत असत.ते दररोज जनसेवेत मध्ये मग्न राहायचे.सकाळ पासुन कार्यालयात येऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे.अजितदादा पवार हे उत्तम प्रशासक आणि लोकसेवक होते.मुख्यमंत्री पद त्यांना खुणावत राहिले आणि हुलकावणीही देत राहिले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झालेला आहे. अजितदादा पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले परिपक्व धुरंधर नेते होते.आज ही शरद पवारांशी अजितदादा चे संबंध चांगले होते.शरद पवारांना शिवसेना चालते तर भाजपशी युती का नको अशी भुमीका अजित पवारांनी अनेक वेळा मांडली होती.भाजपशी युती करण्यास शरद पवारांनी नकार दिला आहे.
मी अनेकदा अशी भुमिका मांडली की जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस सोडुन समाजवादी काँग्रेस स्थापन केली. त्या बळावर पुलोदचे सरकार स्थापन केले. तेव्हा मुख्यमंत्री शरद पवारंच्या मंत्रीमंडळात उत्तमराव पाटिल आणि हशु अडवानी हे दोन भाजपचे मंत्री होते.शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए मध्ये येण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता.शरद पवारांनी एन डी ए मध्ये येण्याचा निर्णय घेतला असता तर ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते.शरद पवारांनी एन डी ए मध्ये यावे ही माझी भुमिका होती.तिच अजितदादा पवारांची ही भुमिका होती..महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करीन एन डी ए मध्ये येण्याचा अजितदादा पवार यांचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.अजितदादा पवारांनी महाराष्ट्रात नवा इतिहास घडविला आहे. इतिहास घडविणारे धुरंधर नेतृत्व अजितदादा पवार अकाली आपल्याला सोडून गेले. अजितदादा पवार यांचे निधन महाराष्ट्राचे काळीज चिरणारे दुःख आहे. अजितदादा यांना देशभरातील लाखो रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने ;आंबेडकरी जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
रामदास आठवले केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री नवी दिल्ली