◼️अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे

◻️आज सायंकाळी ५ वाजता होणार शपथविधी

मुंबई । झुंझार न्यूज

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक सुवर्णक्षण लिहिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे. सुनेत्रा पवार आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला संमती दिली असून, आज सायंकाळी राजभवन येथे हा सोहळा पार पडणार आहे.

दुपारी २ वाजता विधिमंडळ पक्ष बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे विधिमंडळ नेतेपद रिक्त झाले होते. या पदासाठी नव्या नेत्याची निवड करण्यासाठी आज, शनिवारी (दि. ३१) दुपारी २ वाजता मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार असून, सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली जाणार आहे.


राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही खांद्यावर

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे केवळ उपमुख्यमंत्रीपदच नाही, तर पक्षाचे ‘राष्ट्रीय अध्यक्षपद’ देखील सोपवण्यात येणार आहे. विधिमंडळ पक्षनेते निवडीनंतर पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिकता पूर्ण करेल. अजितदादांच्या निधनानंतर पक्षाला खंबीर नेतृत्व मिळावे, या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्यावर ही दुहेरी जबाबदारी सोपवली जात आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सक्रिय

पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रफुल्ल पटेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे, मात्र सुनेत्रा पवार यांनीच ही धुरा सांभाळावी, अशी आम्हा सर्व आमदारांची आणि राज्यातील जनतेची भावना आहे. आम्ही लवकरच पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करू.”

भाजपचा पूर्ण पाठिंबा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंब जो काही निर्णय घेईल, त्याला आमचा सरकार आणि भाजप म्हणून पूर्ण पाठिंबा राहील,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यामुळे महायुतीमधील समन्वय कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.


राजकीय सल्लागार बारामतीत

सुनेत्रा पवार यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय सल्लागार अरोरा सध्या बारामतीत तळ ठोकून असून, स्थानिक पातळीवर आणि बारामतीमधील कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने बारामतीला पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेतील महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.

अजितदादांच्या आठवणीने राज्य हळहळले

गेल्या बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी आणि दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले आहे.

आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *