ह.भ.प. चैतन्य महाराज देवळालीकर यांच्या ओजस्वी वाणीने आश्वी खुर्द मंत्रमुग्ध

 

 

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सोनवणे वस्तीस्थित श्री चिदंबर महास्वामी देवस्थान येथे सुरू असलेल्या ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञा’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. राहुरी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. चैतन्य महाराज देवळालीकर यांच्या ओजस्वी, रसाळ आणि हृदयस्पर्शी निरूपणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.

चिदंबरस्वरूप सद्गुरू उमाकांतजी यांच्या प्रेरणेने व पूज्य गुरुजनांच्या आशीर्वादाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी ९०० हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावून भागवत श्रवणाचा लाभ घेतला. महाराजांनी आपल्या प्रभावी शैलीत ‘भागवत महात्म्य’ आणि ‘भक्तीचे महत्त्व’ उलगडून सांगताना उपस्थितांना भक्तीरसात चिंब भिजवले.

या सोहळ्यानिमित्त मंदिर व संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी उजळून निघालेल्या वातावरणात सुरू असलेले महाराजांचे प्रवचन भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे.

दररोज सायंकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत कथा सुरू असून, कथेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सातदिवसीय सोहळा दि. ३० जानेवारी ते ०३ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह.भ.प. चैतन्य महाराजांच्या अमृतवाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *