स्मारकासाठी जमीन आणि अविनाश आल्हाट हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी लढा तीव्र

आळे । झुंझार न्यूज

मागील १८ ते २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या, प्रशासकीय अकार्यक्षमता आणि दलित मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात ‘साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समिती’च्या वतीने आळे (ता. जुन्नर) येथे बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ पासून ‘बेमुदत महाधरणे आंदोलन’ पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र शासनाच्या ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. राजेंद्र लक्ष्मण आल्हाट करत असून, त्यांच्यासोबत संपूर्ण आल्हाट कुटुंबीय या न्यायाच्या लढ्यात उतरणार आहेत.

◼️आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आणि पार्श्वभूमी◼️

१. १८ वर्षांच्या संघर्षाचा हिशोब आणि न्याय

सन २००९ ते २०२५ या कालावधीत विविध आंदोलने आणि निवेदनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे अनेक प्रश्न मांडण्यात आले. मात्र, संबंधित विभागांचे अकार्यक्षम अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. या प्रकरणांचा लेखी अहवाल आणि न्यायनिवाडा तात्काळ करावा, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे.

२. राष्ट्रीय स्मारकासाठी ५ एकर जमिनीची मागणी

आळे येथील शासकीय जमीन गट क्रमांक २८८४ मधील ३ हेक्टर ५८ आर जमिनीपैकी ५ एकर जमीन डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने जमिनीचा ताबा दिलेला नाही. हे स्मारक भव्य स्वरूपात शासकीय निधीतून उभारले जावे, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

३. अविनाश आल्हाट ‘हत्या’ प्रकरणाचा फेरतपास

१ ऑगस्ट २०२० रोजी स्मारक स्थळी आंदोलन सुरू असताना अविनाश ललित आल्हाट या १९ वर्षीय दलित मातंग युवकाचा मृत्यू झाला होता. आंदोलकांचा आरोप आहे की, ही निर्घृण हत्या होती, मात्र तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी याला ‘आत्महत्येचे’ रूप देऊन पुरावे नष्ट केले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर कलम ३०२ व ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी आल्हाट कुटुंबीयांनी केली आहे.


४. तहसीलदार सुनील शेळके यांच्यावर कारवाईची मागणी

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत, मागील १८ वर्षांचा संघर्ष धुडकावून लावत स्मारक जमिनीचा प्रस्ताव नव्याने करण्यास सांगण्यात आले. हा दलित मातंग समाजाचा आणि डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा अवमान असल्याचा आरोप करत, तहसीलदार सुनील शेळके यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

५. प्रशासकीय अनास्था आणि सुरक्षेची मागणी

मंत्रालय स्तरावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार निवेदने देऊनही जातीयवादी मानसिकतेतून अन्याय करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. या आंदोलनादरम्यान आंदोलक कुटुंबाला शासन आणि पोलीस प्रशासनाने पूर्ण संरक्षण द्यावे, अशी विनंतीही राजेंद्र आल्हाट यांनी केली आहे

 


“आमच्या हक्कासाठी आणि महापुरुषाच्या स्मारकासाठी आम्ही अनेक वर्षे शांततेने लढा दिला, पण प्रशासनाने फक्त वेळकाढूपणा केला. आता जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन आणि कारवाई होत नाही, तोपर्यंत हे महाधरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा पवित्रा राजेंद्र लक्ष्मण आल्हाट यांनी घेतला आहे.

या आंदोलनामुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमीदार

आळे, ता. जुन्नर.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *