संभाजीनगर । झुंझार न्यूज
दिनांक २८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्र राजकारणासाठी आणि सर्वसामान्यांसाठी काळाकुट्ट दिवस ठरली. राज्याचे लाडके नेतृत्व आणि खंबीर प्रशासक अजित पवार (दादा) यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले. या धक्क्यातून सामान्य जनता अजूनही सावरलेली नाही. याच पार्श्वभूमीवर, संभाजीनगर येथील प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉ. अक्षय कर्डिले यांनी दादांसोबतच्या आपल्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला आहे.

घाटी हॉस्पिटलमधील तो ‘शॉक’ देणारा क्षण
डॉ. अक्षय कर्डिले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “२८ तारखेच्या सकाळी नेहमीप्रमाणे मी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘Post-Op’ राऊंडसाठी सकाळी नऊ वाजता पोहोचलो होतो. रुग्णांची तपासणी सुरू असतानाच घरून फोन आला. समोरून सांगण्यात आलं की, ‘टीव्हीवर बातमी येतेय, अजित दादांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं असून त्यांचा मृत्यू झालाय.’ तो क्षण माझ्यासाठी सुन्न करणारा होता. कानावर पडलेल्या शब्दांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. मन एका क्षणात भूतकाळात गेलं.”

पहिली भेट आणि दादांचा तो ‘खास’ अंदाज
डॉ. कर्डिले यांनी दादांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. रेसिडेन्सीदरम्यान बारामती येथे आयोजित एका आरोग्य शिबिरात (कॅम्प) प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सरांनी अक्षय कर्डिले यांची ओळख अजित पवारांशी करून दिली होती. “महाराष्ट्राच्या मार्ड (MARD) संघटनेचा सेक्रेटरी” अशी ओळख करून दिल्यानंतर दादांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता अक्षय यांना जवळ बोलावून घेतले.

फाइल शेवटी माझ्याकडेच येणार!
त्या वेळी निवासी डॉक्टरांच्या महागाई भत्त्याचा (DA) प्रश्न प्रलंबित होता. जेव्हा डॉ. कर्डिले यांनी दादांना सांगितले की, “आम्ही या प्रश्नासाठी सर्व नेत्यांना भेटलो आहोत,” तेव्हा दादांनी त्यांच्या खास मिश्किल शैलीत उत्तर दिले होते. दादा म्हणाले होते, “बेट्या… तू कुणालाही भेटला तरी शेवटी सही करायला फाईल माझ्याकडेच येणार. PA चा नंबर घे आणि एकदा मंत्रालयात ये.”

दादांच्या त्या शब्दांमधील आत्मविश्वास आणि प्रशासनावर असलेली पकड आजही डॉक्टरांच्या मनात घर करून आहे. तो भारदस्त आवाज आणि कामाचा उरक आज केवळ आठवणींच्या रूपात उरला आहे.

प्रभावी नेतृत्व हरपले
अजित पवारांच्या भाषणाची शैली, लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती आणि कडक शिस्त यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. युट्यूबवर त्यांची भाषणे ऐकताना आजही त्यांच्या हजरजबाबीपणाची प्रचिती येते, असे डॉ. कर्डिले यांनी नमूद केले.

“एवढा मोठा नेता, एवढं प्रभावी व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नाही, हे मन स्वीकारायला तयार नाही,” अशा शब्दांत डॉ. अक्षय कर्डिले यांनी दादांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. एका प्रशासकाचा, एका मार्गदर्शकाचा आणि ‘आपल्यातल्या माणसाचा’ असा हा दुर्दैवी अंत सर्वांनाच चटका लावून गेला आहे.
Post Views: 588
