आश्वी । झुंझार न्यूज
आश्वी खुर्द येथील पोस्ट ऑफिसच्या विलीनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घातले आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी त्यांनी थेट केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करत पाठपुरावा सुरू केल्याने आश्वीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या ४२ वर्षांपासून अविरत सेवा देणारे आणि नफ्यात असणारे हे पोस्ट ऑफिस आश्वी बुद्रुकमध्ये विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि हजारो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे संचालक ॲड. अनिल भोसले, सरपंच सौ. अलकाताई गायकवाड आणि स्वीय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष मकरंद गुणे उपसरपंच बाबा भवर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ना. विखे पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेताच ना. विखे पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता डाक विभागाच्या मुंबई, पुणे आणि श्रीरामपूर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. “ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या आणि नफ्यात चालणाऱ्या या पोस्ट ऑफिसचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच यासंदर्भात केंद्राकडेही सविस्तर मांडणी केली आहे.
सोपान सोनवणे, संजय गायकवाड, संतोष भडकवाड, देवराम गायकवाड, बाबासाहेब भोसले, अनिल सोनवणे, दीपक सोनवणे, मनोज मेहरे, सुजित क्षीरसागर आणि आशिष गायकवाड आदी उपस्थित होते.
ना. विखे पाटील यांनी घेतलेल्या या खंबीर आणि सकारात्मक भूमिकेमुळे प्रशासन स्तरावर हालचालींना वेग आला असून, विलीनीकरणाचा निर्णय स्थगित होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


