अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांनी जागवल्या आठवणी

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला एक धडाडीचा नेता हरपल्याची भावना अहिल्यानगर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून स्व. अजितदादांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

स्पष्ट विचार आणि ठाम भूमिका हेच दादांचे वैशिष्ट्य: ना. राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांसोबत विधीमंडळात अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. स्पष्ट विचार, ठाम भूमिका आणि तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांची खरी ओळख होती. सत्तेत असो वा विरोधात, त्यांनी नेहमीच जनहिताला प्राधान्य दिले. राज्याच्या महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी केवळ सत्तेसाठी घेतला नव्हता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा आणि जागतिक स्तरावरील त्यांच्या प्रभावाचा विचार करून त्यांनी हे पाऊल उचलले होते. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी त्यांनी नेहमीच सढळ हाताने मदत केली.

 

 

सहकार क्षेत्राचा चालता-बोलता ‘एनसायक्लोपीडिया’: बाळासाहेब थोरात

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले की, “अजितदादांचे निधन केवळ दुर्दैवी नसून मन सुन्न करणारे आहे. १९९१ मध्ये खासदार झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने राजकारणात अढळ स्थान निर्माण केले होते. १९९२ पासून आमचा स्नेह होता. सहकार क्षेत्रातील बारकावे, साखर कारखाने, जिल्हा बँका आणि अगदी नवी मुंबई बाजार समितीपर्यंतची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असायची. इतका सखोल अभ्यास असलेला नेता क्वचितच पाहायला मिळतो.”

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, “दादांचा दिवस पहाटे ६ वाजता सुरू व्हायचा. ‘नाही’ म्हणायचे असेल तर ते तोंडावर स्पष्टपणे सांगायचे. कुणी दुखावेल याचा विचार न करता सार्वजनिक हिताचे कटू निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात होती. अशा ऊर्जावान नेतृत्वाचे अचानक निघून जाणे हे राज्याचे आणि देशाचे मोठे नुकसान आहे.”

या शोकसभेला जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के , आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिकाताई राजळे, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, विवेक कोल्हे, नरेंद्र घुले, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, दादाभाऊ कळमकर , आमदार विठ्ठलराव लंघे , आमदार काशिनाथ दाते ,  यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. “अजितदादा कायम स्मरणात राहतील,” अशा भावना यावेळी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केल्या. या शोकसभेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *