राहता-पानोडी रस्त्याबाबत व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांना दिलासा

गावातील गट-तटाचे राजकारण सोडून मुलांच्या भविष्याचा विचार करण्याचे पालकांना आवाहन

आश्वी । झुंझार न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत असताना भविष्यात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेने आता गट-तटाचे आणि कोर्ट-कचेरीचे राजकारण थांबवून आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित करावे,” असे प्रतिपादन राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आश्वी खुर्द येथील निलेश भवर यांच्या वस्तीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रातील नवीन प्रकल्प, रस्ते विकास आणि वीज प्रश्नावर महत्वपूर्ण भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड होते.

तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती देताना ना. विखे पाटील म्हणाले की, “शिर्डी एमआयडीसी आणि राहुरी विद्यापीठाच्या जागेवर सुमारे ५०० एकर क्षेत्रात ‘डिफेन्स हब’ (संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र) साकारले जात आहे. या प्रकल्पात ३०० ते ३५० किलोमीटर मारक क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आणि तोफांची निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक तरुणांनी केवळ पदवीधर न राहता आयटीआय आणि तांत्रिक शिक्षण घेऊन या मोठ्या संधीसाठी स्वतःला तयार करावे.

व्यापाऱ्यांनी भयभीत होऊ नये; रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार

राहता ते पानोडी रस्ते विकास कामामुळे आश्वी खुर्द येथील व्यापाऱ्यांना नोटिसा मिळाल्याने भीतीचे वातावरण होते. यावर स्पष्टीकरण देताना ना. विखे पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिला. ते म्हणाले, “विकास कामे करताना कोणाचेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. दुकानांत किंवा घरात पावसाचे पाणी शिरू नये, यासाठी रस्ता खोदून खाली घेणे आणि ‘अंडरग्राउंड’ गटारींची व्यवस्था करणे यावर विचार सुरू आहे. यातून सर्वसमावेशक मार्ग काढला जाईल, व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

गट-तटाचे राजकारण सोडा, शिक्षणावर लक्ष द्या!

गावागावात होणाऱ्या वादांवर भाष्य करताना मंत्र्यांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या. “पंतप्रधान मोदींना जगभरातून सन्मानाने बोलावले जात आहे, भारताचा डंका वाजत आहे. अशा काळात आपण छोट्या वादांत अडकून राहणे चुकीचे आहे. आपल्या मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर भांडणे गावातच मिटवा, कोर्टाची पायरी चढू नका. मुलांच्या शिक्षणासाठी वेळ आणि पैसा खर्च करा,” असे आवाहन त्यांनी केले.


शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार

परिसरातील शेती पंपांच्या वीज प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, वरवंडी सौरऊर्जा प्रकल्प आणि शिबलापूर सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे लवकरच आश्वी खुर्द, माळेवाडी, शेडगाव, चनेगाव, दाढ खुर्द आणि झरेकाठी परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

या मेळाव्याला प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष मकरंद गुणे, विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड. अनिल भोसले, माजी संचालक डॉ. दिनकर गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब भवर, निलेश भवर यांच्यासह परिसरातील सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *