अहिल्यानगर । झुंझार न्यूज 

 


अहिल्यानगर महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, यामध्ये सौ. ज्योती गाडे यांची महापौरपदी, तर श्री. धनंजय जाधव यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) यांच्या समन्वयातून ही निवड करण्यात आल्याने शहराच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळत आहे.


निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी स्व. नेत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी विशेषत्वाने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , आ. संग्राम जगताप , डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी सर्व नगरसेवकांशी वैयक्तिक संवाद साधला आणि महापालिकेच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

या महत्त्वपूर्ण बैठकीत केवळ निवडीवरच भर दिला गेला नाही, तर अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराचे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रलंबित विकासकामांबाबत नगरसेवकांनी आपली मते मांडली. “शहराचा विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” असा सूर या बैठकीत उमटला.


महापौरपदी निवड झालेल्या सौ. ज्योती गाडे आणि उपमहापौरपदी निवड झालेले श्री. धनंजय जाधव यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. निवडीनंतर बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “नूतन महापौर आणि उपमहापौरांनी येणाऱ्या कार्यकाळात सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन, समन्वयाने आणि लोकाभिमुख काम करावे. अहिल्यानगरला विकासाच्या बाबतीत एका नव्या उंचीवर नेण्यासाठी या जोडीकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.


या निवडीमुळे अहिल्यानगर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची पकड अधिक घट्ट झाली आहे. आगामी काळात ही नवी टीम शहराच्या प्रश्नांवर कशी मात करते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला.

 


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *