आदीवासी पाड्यामध्ये सोलार,शाळांना स्वच्छतागृहाच्या केल्या सूचना

जिल्हा आदिवासी घटक जिल्हास्तरीय बैठक संपन्न

 

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 

 

जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमधील विजेची समस्या लक्षात घेवून त्या पाड्यांमध्ये सोलार हायमास्ट बसविणे, सोलार स्ट्रीट लाईट बसविणे, पाणी पुरवठा योजनेकरीता सोलार पंप बसविणे, जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना स्वच्छतागृहे बांधणे व अकोले तालुक्यातील पर्यटनाच्या विकास योजनेकरीता वाढीव निधी देण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.

 

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०२६-२०२७ प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उइके यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठकीचे दूरदृष्य प्रणाली द्वारे करण्यात आले होते.अहील्यानगर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना.श्री. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ.डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रकल्प अधिकारी श्रीमती. देवकन्या बोकडे व इतर सर्व शासकीय यंत्रणेचे अधिकारी सदर बैठकीस उपस्थित होते.

 

सदर बैठकीत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०२६-२०२७ राज्यस्तर प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सादरीकरण केले. .

 

जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.ना.श्री. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील महोदयांनी जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमधील विजेची समस्या लक्षात घेवून त्या पाड्यांमध्ये सोलार हायमास्ट बसविणे, सोलार स्ट्रीट लाईट बसविणे, पाणी पुरवठा योजनेकरीता सोलार पंप बसविणे, जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना स्वच्छतागृहे बांधणे व अकोले तालुक्यातील पर्यटनाच्या विकास योजनेकरीता वाढीव निधी देणे बाबतच्या सूचना बैठकी दरम्यान केल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे आदिवासी विकास विभागाचे उपकार्यालय सुरु करून प्रकल्प अधिकारी, राजूर यांनी आठवड्यातून किमान एक दिवस व इतर आवश्यक कर्मचारी यांनी उपकार्यालयात कामकाज करणे बाबतचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

 

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपकार्यालय सुरु असल्याबाबत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना व जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना कळविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

 

बैठकीत मार्गदर्शन करताना आदिवासी मंत्री.डॉ.अशोक उईके यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एक शासकीय आश्रमशाळा मॉडेल स्कूल बनविण्याचे निर्देश दिले व सदर मॉडेल स्कूल सन्माननीय पालकमंत्र्यांनी दत्तक घेण्याची विनंती केली. आदिवासी महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकता वाढवून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणे व सदर कामास प्राध्यान्य देणे, राणी दुर्गावती महिला सबलीकरण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, आदिवासी व ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *