◻️राहात्याच्या विकासाला ‘सफारी’चा वेग

◼️३५ कोटींच्या दूधेश्वर प्रकल्पातून शेकडो हातांना मिळणार रोजगार – डॉ. सुजय विखे पाटील

राहाता । झुंझार न्यूज

 

 

राहाता तालुक्याचे राजकारण हे सध्या पळत्या घोड्यासारखे वेगवान झाले आहे. राजकारण म्हणजे केवळ रस्ते बांधणे किंवा सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावणे इतपत मर्यादित न ठेवता, ते सर्वसमावेशक असावे. लोकांच्या हाताला शाश्वत रोजगार मिळवून देणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे,” अशी भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी काळातील विकासकामांचा आराखडा आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

दूधेश्वर सफारी: पर्यटनासोबत रोजगाराची संधी

शिर्डी विधान सभा मतदार संघातील दूधेश्वर ( निमगांव जाळी ) येथे ३५ कोटी रुपये खर्च करून ‘सफारी’ प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती डॉ. विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, “केवळ घोषणा करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडला पाहिजे. या एका प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जेव्हा लोक कामात गुंतलेले असतात, तेव्हाच समाजाची प्रगती होते. रिकाम्या वेळातून विघातक प्रवृत्ती जन्म घेतात, त्यामुळे तरुणांना उद्योगाकडे वळवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज

राजकारणाच्या पारंपरिक व्याख्येवर टीका करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “राजकारण हे आश्वासनांच्या पलीकडे गेले पाहिजे. केवळ रस्ते दुरुस्ती किंवा दहाव्याच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे म्हणजे लोकप्रतिनिधीचे काम नव्हे. खरा लोकप्रतिनिधी तोच जो सर्वसमावेशक विचार करून शेवटच्या माणसाच्या आर्थिक उन्नतीचा विचार करतो. लोकांच्या हाताला काम देणे ही माझी प्राथमिकता आहे.


पत्रकार हा समाजाचा आरसा

पत्रकारितेच्या क्षेत्राबद्दल बोलताना त्यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. “पत्रकार हा निर्भिड असला पाहिजे. समाजात काय चालले आहे, याची खरी रेलचेल पत्रकारांमुळेच समजते. अनेकदा राजकारणात ‘सुप्त लाट’ असते, जी धोक्याची घंटा ठरू शकते. अशा वेळी पक्षाचा कार्यकर्ता कदाचित खरी परिस्थिती सांगायला कचरेल, पण पत्रकार हा नेहमी स्पष्ट संदेश देतो. त्यामुळेच लोकप्रतिनिधीने पत्रकारांच्या फीडबॅककडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.


या संवादातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी आगामी काळात राहाता तालुक्यात केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या प्रकल्पांवर भर देण्याचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमाला तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed