आश्वी शिबलापूर सिमेवर असलेल्या मांढरे वस्ती परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक २९९/२ मधील शेतकरी श्री. राजेंद्र संपत मांढरे(आश्वी खुर्द) यांच्या गोठ्यातून बुधवारी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास नऊ महिन्यांची कालवड बिबट्याने पळवून नेल्याची घटना घडली.
ही कालवड गोठ्यातून ओढत नेत शेजारील उसाच्या शेतात ठार केल्याचे सकाळी उघडकीस आले. सकाळी घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून परिस्थितीची पाहणी केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात बिबट्याचा उपद्रव वाढलेला असून रात्रीच्या वेळी जनावरांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लहान मुले व महिलांच्या सुरक्षेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.
वनविभागाने नागरिकांनी रात्री एकटे फिरणे टाळावे, जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत व संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे. मात्र वाढत्या घटनांमुळे ठोस उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.