आश्वी । झुंझार न्यूज

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, अशा काळात संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील शेख कुटुंबियांनी प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. रस्त्यात सापडलेली सुमारे ८० ते ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत (गठन) आणि रोख रक्कम मूळ मालकाला परत करून रशिद चंदुलाल शेख यांनी ‘माणुसकी हाच खरा धर्म’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी खरशिंदे (ता. संगमनेर) येथील रहिवासी रशिद चंदुलाल शेख हे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त आश्वीवरून घरी परतत होते. सायंकाळच्या सुमारास शिबलापूर ते पानोडी शिवारात रस्त्यावर त्यांना एक छोटी पर्स पडलेली आढळली. रशिद शेख यांनी ती पर्स उचलली आणि सुरक्षितपणे आपल्या घरी आणली.

घरी आल्यानंतर त्यांनी पर्स उघडून पाहिली असता, त्यात सोन्याचे मौल्यवान दागिने (गठन), १२५ रुपये रोख आणि एका कृषी सेवा केंद्राचे बिल आढळले. रशिद शेख यांचा मुलगा मोसीन शेख याने प्रसंगावधान राखत त्या बिलावर असलेल्या संपर्क क्रमांकावर फोन केला. कृषी केंद्रातून माहिती घेतली असता, ही पर्स पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सुभाष चंद्रकांत गावडे यांची असल्याचे समजले. मोसीन यांनी तात्काळ गावडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना पर्स सापडल्याची माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी, बुधवार ४ फेब्रुवारी रोजी सुभाष चंद्रकांत गावडे यांना खरशिंदे येथे बोलावण्यात आले. पर्समधील वस्तूंची खातरजमा केल्यानंतर, रशिद शेख यांनी ती पर्स सन्मानाने गावडे यांच्या स्वाधीन केली. त्या पर्समध्ये असलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत ८० ते ९० हजार रुपये इतकी होती. आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने सुभाष गावडे यांचे डोळे पाणावले. त्यांनी शेख कुटुंबियांचे मनापासून आभार मानले.

आजच्या काळात एवढ्या मोठ्या किमतीचे सोने सापडल्यानंतरही कोणताही मोह न ठेवता ते परत करणाऱ्या रशिद चंदुलाल शेख आणि मोसीन शेख यांच्या प्रामाणिकपणाचे ढवळपुरी, पारनेर आणि संगमनेर परिसरात मोठे कौतुक होत आहे. “प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed