अवैध धंदे अन् गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान; ‘सिंघम’ स्टाईल कारवाईची प्रतीक्षा!
आश्वी । झुंझार न्यूज
राजकीय, सामाजिक आणि व्यापारी दृष्ट्या अत्यंत संवेदनशील केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आश्वी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची धुरा आता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या खांद्यावर आली आहे. राहुरी पोलीस ठाण्यातून बदली होऊन आलेले शिरसाठ यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारताच त्यांच्यासमोर आश्वी परिसरातील फोफावलेले अवैध धंदे आणि मोकाट गुन्हेगारीला वेसण घालण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शिरसाठ हे आश्वीत ‘खाकी’चा दरारा पुन्हा निर्माण करणार का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही काळापासून आश्वी आणि परिसरात कायद्याचा धाक मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याची चर्चा जनमानसात उघडपणे होत आहे. अवैध वाळू उपसा, छुप्या पद्धतीने चालणारे जुगार अड्डे, अवैध दारू विक्री यांसारख्या व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातच किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामारीच्या घटना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिरसाठ यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
सुदाम शिरसाठ यांचा यापूर्वीचा राहुरी येथील कार्यकाळ यशस्वी मानला जातो. तिथे त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात यश मिळवले होते. मात्र, आश्वीचे ‘मैदान’ राजकीय दृष्ट्या वेगळे आहे. येथे स्थानिक दबावगट आणि राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर असतो. अशा दबावांना बळी न पडता कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, ही शिरसाठ यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कसोटी ठरणार आहे.
नव्या अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. नागरिकांनी प्रामुख्याने खालील मागण्यांकडे लक्ष वेधले आहे:
१. गावागावात आणि वाड्यावस्त्यांवर लपून-छपून सुरू असलेले अवैध धंदे तातडीने मुळासकट बंद करावेत.
२. रस्त्यावर आणि मुख्य चौकात रात्री-अपरात्री होणारी ‘भाईगिरी’ आणि टवाळखोरी मोडून काढावी.
३. टोळीयुद्ध आणि गंभीर हाणामारीच्या घटनांत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलची हवा दाखवावी.
४. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सन्मानाची वागणूक मिळावी.
शिरसाठ हे पदभार स्वीकारल्यानंतर केवळ खुर्ची सांभाळणार की पहिल्या दिवसापासूनच ‘ॲक्शन मोड’मध्ये येऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर त्यांनी सुरुवातीच्या काळातच काही मोठ्या कारवाया केल्या, तरच आश्वीत कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यास मदत होईल. अन्यथा, परिस्थिती ‘जैसे थे’ राहून गुन्हेगारांचे मनोबल अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकूणच, आश्वीकरांना आता एका धडाकेबाज ‘सिंघम’ स्टाईल कारवाईची प्रतीक्षा आहे. सुदाम शिरसाठ हे जनसामान्यांच्या अपेक्षांना किती उतरतात आणि गुन्हेगारीचा बीमोड कसा करतात, यावरच त्यांचा पुढील कार्यकाळ अवलंबून असेल .




