संगमनेर । झुंझार न्यूज

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, मात्र आपल्या कर्तृत्वाने, संयमाने आणि सुसंस्कृतपणाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात. ७ फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस. आजच्या धावपळीच्या आणि काहीशा गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात, बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले की, राजकारणातील एक ‘राजहंस’ व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाणी वेगळे करून केवळ गुणांचा स्वीकार करतो, त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरातांनी राजकारणातील संघर्षातही आपली सुसंस्कृतता आणि नीतिमत्ता जपली आहे.

बाळासाहेब थोरात यांना सहकाराचे बाळकडू त्यांचे वडील, सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्याकडून मिळाले. भाऊसाहेबांनी संगमनेरच्या दुष्काळी मातीत सहकाराचे बी पेरले. गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी त्यांनी उभी केलेली सहकाराची पंढरी आज देशासाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. बाळासाहेबांनी हाच वारसा केवळ जपला नाही, तर तो अधिक समृद्ध केला.

संगमनेरमधील साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था आणि अमृतवाहिनी सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी हजारो हातांना काम दिले. आज ‘संगमनेरचा सहकार’ म्हटले की, संपूर्ण देशात एक शिस्तबद्ध आणि यशस्वी मॉडेल म्हणून त्याकडे पाहिले जाते. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केवळ संस्था काढल्या नाहीत, तर लोकांचे जीवनमान उंचावून संगमनेरला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.


बाळासाहेब थोरात यांची ओळख एक ‘मितभाषी’ नेता म्हणून आहे. आक्रमकता म्हणजे केवळ आरडाओरडा नव्हे, तर आपल्या विचारांवर ठाम राहून संयमाने प्रतिपक्षाला उत्तर देणे, ही त्यांची शैली आहे. राजकारणात अनेक चढ-उतार आले, सत्ता आली आणि गेली, पण थोरातांचा तोल कधीच ढळला नाही. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध हे त्यांच्या अजातशत्रुत्वाचे प्रतीक आहे. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.

राज्याच्या राजकारणात त्यांनी महसूल, कृषी, शिक्षण आणि पाटबंधारे यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. महसूल मंत्री असताना त्यांनी घेतलेले लोकहितैषी निर्णय आजही जनमानसात चर्चेत आहेत. प्रशासनावर पकड असूनही अधिकाऱ्यांशी वागताना त्यांचा सुसंस्कृतपणा कधीच कमी झाला नाही. राज्याच्या विकास आराखड्यात संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने विचार केला.

एखादा मोठा नेता तेव्हाच घडतो, जेव्हा त्याच्या मागे निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी असते. बाळासाहेबांनी नेहमीच सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली. राजकारण आणि सहकारात काम करताना त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी दिली आणि त्यांना घडवले. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.

बाळासाहेब थोरात यांनी राजकारणासोबतच समाजकारणाला आणि धार्मिकतेलाही महत्त्व दिले. मात्र, त्यांची धार्मिकता ही अंधश्रद्धेची नसून ती मानवी कल्याणाची आहे. विविध धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे आणि जातीपातीची भिंत तोडून माणसांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.

बाळासाहेब थोरात म्हणजे केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे. सत्ता असो वा नसो, लोकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणे आणि संघर्षातही संयम न गमावणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा हा संयमी राजहंस असाच तळपत राहो, हीच सदिच्छा!

बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांचे हे सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शक ठरत राहो.

 

 

 

मा. रणजितसिंह देशमुख

 

चेअरमन : संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ .

 

माजी चेअरमन : महानंदा राज्य सहकारी दूध संघ

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed