संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथे ‘श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड’ येथील कृषी कन्यांच्या पुढाकाराने ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत’ (RAWE) भव्य कृषी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार कृषी कन्यांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी जवळेकडलगचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी तसेच महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. के.आर. शिंदे मॅडम उपस्थित होत्या.

मेळाव्यात उपस्थित तज्ज्ञ वक्त्यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले:
१) अनिल देशमुख (कृषी बायोटेक, विरगाव): यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि बायोटेकच्या वापराबाबत माहिती दिली.
२) वाळीबा उघडे (पंचायत समिती कृषी अधिकारी): यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
३) संदीप सानप (मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर): यांनी शेतमालाचे विपणन आणि बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन केले.
४) कुशल ठोकळे (सहाय्यक कृषी अधिकारी): यांनी पीक संवर्धन आणि योग्य कीटकनाशक वापराबाबत तांत्रिक माहिती दिली.
५) हिरालाल सुर्वे (माजी जिल्हा कृषी अधिकारी): यांनी खत व्यवस्थापन आणि जमिनीचा पोत सुधारण्याबाबत मोलाचे सल्ले दिले.

विशेषतः या चर्चासत्रात डाळिंब शेतीतील समस्या, रोग व्यवस्थापन आणि खतांचे संतुलित नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळेकडलग गावचे माजी सरपंच कैलास देशमुख होते. त्यांनी आपल्या भाषणात कृषी कन्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन केले. शेवटी त्यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या काळे प्रियंका, गायकवाड गितांजली, अनिशा वाळके, संस्कृती खैरनार, पुजा बुळे आणि तनुजा मधे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
