बेल्हे । झुंझार न्यूज
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. तालुक्यातील बांगरवाडी शिवारातील गणविहीर मळा येथे बिबट्याने एका बंदिस्त गोठ्यात घुसून सात शेळ्यांना जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या सुस्त कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगरवाडी येथील शेतकरी रामभाऊ राणू बांगर यांचा घराशेजारीच बंदिस्त गोठा आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने या बंदिस्त गोठ्यात प्रवेश मिळवला आणि तिथे असलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात रामभाऊ बांगर यांच्या सात शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली, तेव्हा गोठ्यातील दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १ ते १.२५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हा हल्ला एखाद्या एका बिबट्याचा नसून दोन ते तीन बिबट्यांच्या टोळीने केलेला सामूहिक हल्ला असावा, अशी दाट शक्यता बांगरवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबू बांगर यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी सात शेळ्यांचा बळी घेतल्याने बिबट्यांच्या वाढत्या संख्येचा आणि त्यांच्या हिंस्त्रपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बांगरवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. येथील ग्रामस्थांनी बेल्हे वनविभागाकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वनविभागाने या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. सात शेळ्यांचा बळी गेल्यावर आणि शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यावर आज खडबडून जागे झालेल्या वनविभागाने घटनास्थळी पिंजरा लावला आहे. वनविभागाच्या या भूमिकेवर ग्रामस्थांनी “बैल गेला आणि झोपा केला” अशी खोचक टीका करत संताप व्यक्त केला आहे. जर वेळेत पिंजरा लावला असता, तर आज शेतकऱ्याचे हे नुकसान टाळता आले असते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
आतापर्यंत बिबट्या उघड्यावर असलेल्या जनावरांवर हल्ला करत असे, मात्र आता बिबट्या बंदिस्त गोठ्यांमध्येही शिरकाव करू लागल्याने “पाळीव जनावरे ठेवायची कुठे आणि कशी?” असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. केवळ जनावरेच नव्हे, तर मानवी जीवितालाही या परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे नुकसानग्रस्त शेतकरी रामभाऊ बांगर यांचे कंबरडे मोडले असून, वनविभागाने तात्काळ पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त शासकीय मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, या भागातील बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.






