बेल्हे । झुंझार न्यूज
महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर कडक बंदी असतानाही जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे परिसरात मात्र गुटख्याची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एकीकडे शासन व्यसनमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, बेल्ह्यात मात्र गुटख्याचा महापूर आला आहे. या अवैध व्यवसायाला कोणाचे तरी अभय किंवा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही, अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली असून “गुटखा विक्री जोमात आणि प्रशासन कोमात” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बेल्हे परिसरात गुटख्याचे वितरण करण्यासाठी एक मोठी साखळी कार्यरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरून रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांमधून गुटख्याची पोती बेल्हे येथील ठराविक ठिकाणी उतरवली जातात. त्यानंतर स्थानिक किरकोळ विक्रेते दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांचा वापर करून हा माल आपल्या टपऱ्यांपर्यंत पोहोचवतात. कारवाईचा बडगा टाळण्यासाठी साठा एकाच ठिकाणी न ठेवता तो वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला जातो. यामुळे जर चुकून धाड पडलीच, तरी मोठ्या आर्थिक नुकसानीतून ठोक विक्रेते वाचतात. ही साखळी इतकी घट्ट आहे की, आजूबाजूच्या गावांतही मागणीनुसार हा गुटखा अवघ्या काही तासांत पोहोचवला जातो.

रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे ‘पिचकाऱ्यांनी’ माखली
गुटख्याच्या वाढत्या वापराचा परिणाम गावाच्या स्वच्छतेवरही झाला आहे. बेल्हे गावातील रस्ते, कोपरे आणि विशेषतः सार्वजनिक शौचालयांमध्ये गुटखा खाऊन टाकलेल्या पिचकाऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर जागोजागी गुटख्याच्या रिकाम्या पुड्यांचे खच पडलेले दिसतात. जणू गुटखा बहाद्दरांनी थुंकून सर्वत्र रांगोळीच काढली आहे की काय, असा संतापजनक प्रश्न स्वच्छतेची आवड असणाऱ्या नागरिकांमधून विचारला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
गेल्या अनेक महिन्यांपासून बेल्हे परिसरात गुटखा विक्रीच्या तक्रारी असतानाही अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एकाही मोठ्या विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. प्रशासनाचे हे दुर्लक्ष ‘जाणूनबुजून’ आहे की ‘हेतू पुरस्कार’? असा सवाल उपस्थित होत आहे. जर प्रशासनाला ही बंदी प्रभावीपणे राबवता येत नसेल, तर त्यांनी ही कागदोपत्री बंदी उठवावी, जेणेकरून व्यसनी लोकांना किमान स्वस्त दरात तरी गुटखा मिळेल, असा उपरोधिक टोलाही नागरिकांनी लगावला आहे.

कोवळ्या वयातील मुले आणि महिला व्यसनाच्या जाळ्यात
सर्वात चिंतेची बाब म्हणजे केवळ पुरुषच नव्हे, तर बारा-तेरा वर्षांची शाळकरी मुले आणि महिलाही या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. गुटख्यामुळे तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचे आजार आणि आतड्यांचे विकार जडत असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गुटख्याच्या अतिसेवनाने भूक मंदावणे आणि तोंडाचे स्नायू आखडल्यामुळे जेवण घेण्यास त्रास होणे, अशा समस्यांनी अनेक तरुण ग्रासले आहेत.

एक पिढी बरबाद, विक्रेते मात्र गबर
आपण विकत असलेल्या गुटख्यामुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते किंवा एक संपूर्ण पिढी बरबाद होत आहे, याचे कसलेही सोयरसुतक विक्रेत्यांना उरलेले नाही. पैशाच्या हव्यासापोटी मानवी आरोग्याशी खेळ सुरू असून, यावर आता स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 554

