आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मनोली परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एका बंद घराचे कडी-कोयंडे तोडून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोली येथील रहिवासी विश्राम शिंदे यांच्या घरात ही चोरीची घटना घडली. रविवार, ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी शिंदे यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीच्या दरवाजाचा कडी-कोयंडा शिताफीने कापून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाची उचकापाचक करून चोरट्यांनी त्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत, २.५ ग्रॅम वजनाचे कानातील दागिने आणि १५ हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरून नेला.

सोमवारी सकाळी शिंदे कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना घरातील कपाट उघड्या अवस्थेत आणि सामान विखुरलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने आश्वी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

विश्राम शिंदे यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.रं.नं. १६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(ए) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राम लहामगे करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी मनोली ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
