संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ हा खेळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. जोर्वे जिल्हा परिषद गटातील शेकडो महिला भगिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंदाचे क्षण अनुभवले.
दैनंदिन कामाच्या व्यापातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय खेळाच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला. यावेळी रंगलेले उखाणे आणि विविध गमतीशीर खेळांनी कार्यक्रमात मोठी रंगत आणली.
या सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्यासह सौ. निलमताई अमोल खाताळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोकूळ दिघे, आणि जोर्वे गावाच्या सरपंच सौ. प्रितीताई दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या संघटनशक्तीचे कौतुक करत ते म्हणाले की, “महिला हे कुटुंबाचा कणा आहेत. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची संधी मिळते, हे कौतुकास्पद आहे.” सामाजिक कार्यकर्ते गोकूळ दिघे यांनीही उपस्थितांना संबोधित करत महिलांच्या उन्नतीसाठी सदैव पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यावेळी महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आपल्या लाडक्या नेत्याला आणि मान्यवरांना जवळून पाहण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
जोर्वे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाने जोर्वे जिल्हा परिषद गटात एक नवा उत्साह निर्माण केला असून, सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.