आश्वी । झुंझार न्यूज
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।” समर्थ रामदास स्वामींनी ज्यांचे वर्णन या शब्दांत केले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज केवळ एक राजा नव्हते, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. म्हणूनच ‘शिवचरित्र घरोघरी आणि देवघरी’ असणे ही काळाची गरज आहे.

शिवचरित्र म्हणजे केवळ राजांच्या युद्धांच्या कथा नव्हेत, तर तो एक संस्कारांचा ठेवा आहे. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं, संकटात डगमगून न जाता त्याचा धैर्याने सामना कसा करावा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला सोबत घेऊन स्वराज्याचे स्वप्न कसे साकार करावे, याचा तो एक जिवंत आदर्श आहे. जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेला हा ‘शिवबा’ पुढे जाऊन ‘रयतेचा राजा’ कसा झाला, हा प्रवास म्हणजे शिवचरित्र.
आजच्या धावपळीच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या काळात आपली तरुण पिढी भरकटत चालली आहे. अशा वेळी शिवचरित्र त्यांना योग्य दिशा दाखवू शकते.
१. चारित्र्य संवर्धन: महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानले. हा विचार जर प्रत्येक घराघरात पोहोचला, तर स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना थांबतील.
२. व्यवस्थापन कौशल्य: गनिमी कावा, किल्ल्यांचे व्यवस्थापन, आरमार उभारणी यांतून आधुनिक काळातील ‘मॅनेजमेंट’ शिकता येते.
३. स्वाभिमान: गुलामगिरीची मानसिकता तोडून स्वाभिमानाने कसे जगावे, हे शिवचरित्र शिकवते.

आपल्या संस्कृतीत आपण देवाची पूजा करतो कारण देव आपल्याला संकटात मार्ग दाखवतो आणि शक्ती देतो. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ‘कुलदैवत’ आहेत. ज्याप्रमाणे आपण देवघरात दिवा लावतो, त्याप्रमाणे शिवचरित्राचे वाचन आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करते. देवघरात शिवचरित्र असणे याचा अर्थ असा की, महाराजांचे विचार आपल्या रोजच्या आचरणात असावेत. ज्या घरात शिवचरित्र वाचले जाते, तिथे भीती राहत नाही, तिथे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण होते.
शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र गुंफले. त्यांच्या स्वराज्यात जातीभेद नव्हता, तर फक्त माणुसकी आणि निष्ठा होती. आज समाजात जे जाती-पातीचे राजकारण चालते, त्यावर शिवचरित्र हाच एकमेव उपाय आहे. “महाराजांचा प्रत्येक मावळा आधी स्वराज्याचा होता आणि मग जातीचा,” हा विचार पुन्हा रुजवण्यासाठी घराघरात शिवचरित्र पोहोचले पाहिजे.
आजचा युवक नैराश्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलतो. पण ज्याने शिवचरित्र वाचले आहे, तो कधीही हार मानणार नाही. कारण महाराजांनी पन्हाळगडचा वेढा असो वा आग्र्याहून सुटका, प्रत्येक संकटात संधी शोधली. शिवचरित्र आपल्याला ‘शक्य’ आणि ‘अशक्य’ यातील अंतर कमी करायला शिकवते.
‘शिवचरित्र घरोघरी आणि देवघरी’ याचा खरा अर्थ असा की, महाराजांचे फोटो फक्त भिंतीवर न लावता त्यांचे विचार आपल्या मनात असावेत. जेव्हा प्रत्येक घरातून जिजाऊंचे संस्कार मिळतील आणि प्रत्येक देवघरातून शिवरायांची ऊर्जा मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत, बलवान आणि नीतिमान समाज निर्माण होईल.
महाराजांचे चरित्र हे केवळ वाचण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते –
“आले किती गेले किती, उडून गेला भरारा…
संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबाचा दरारा!”



