जुन्नर तालुक्यातील बेल्हे ग्रामस्थांचे आराध्य दैवत आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या महादेवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण बेल्हे गाव दुमदुमून गेले होते. गावातील एकूण सहा महादेव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
नगेश्वर महादेव मंदिरात महाप्रसादाचे वाटप
गावठाण भागातील ऐतिहासिक नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास महादेवाचा जलाभिषेक व विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होते. विशेष म्हणजे, दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी दिवसभर साबुदाणा खिचडी, साबुदाणा चिवडा आणि केळी अशा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी देवाची मनोभावे आरती करण्यात आली. त्यानंतर रात्री बारा वाजता पुन्हा एकदा अभिषेक आणि महाआरती करून या उत्सवाची सांगता झाली.
बिल्वेश्वर महादेवाची भव्य पालखी
टक्क्यातील श्री बिल्वेश्वर महादेव मंदिरातही भाविकांचा अथांग जनसागर लोटला होता. या ठिकाणी दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीचे औचित्य साधून बिल्वेश्वर महादेवाची भव्य पालखी काढण्यात आली होती. पालखी सोहळ्यादरम्यान भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. वाजत-गाजत निघालेल्या या पालखीने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
हा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आणि भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी डुंबरे, संतोष शिंदे, किरण शिवले, निलेश औटी, तान्हाजी औटी, संकल्प विश्वासराव यांसह गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तांची अलोट गर्दी यामुळे यावर्षीची महाशिवरात्र बेल्हे गावात विशेष लक्षवेधी ठरली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी महादेवाचे दर्शन घेऊन कृतार्थ भावना व्यक्त केली.