आश्‍वी । झुंझार न्यूज

 


संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माधुरी मनोज अरगडे असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, याप्रकरणी आश्‍वी पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 


मिळालेल्या माहितीनुसार, मयत माधुरी हिचे वडील बाळासाहेब रंगनाथ कोटकर (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधुरीचे लग्न १० वर्षांपूर्वी निमगावजाळी येथील मनोज भास्कर अरगडे याच्याशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सुखात गेल्यानंतर, घरगुती कारणावरून सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पती मनोज आणि सासू मिराबाई भास्कर अरगडे हे माधुरीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिवीगाळ व मारहाण करत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 

 

सासरच्या जाचाला कंटाळून माधुरी डिसेंबर २०२५ मध्ये आपली दोन मुले शिवांश आणि विरांश यांच्यासह माहेरी अंभोरे येथे निघून आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी मध्यस्थी केली आणि संसाराचा विचार करून माधुरीला पुन्हा नांदण्यासाठी सासरी पाठवण्यात आले. मात्र, सासरच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.

 

 

बेपत्ता झाल्यानंतर ५ दिवसांनी मृतदेह सापडला


७ फेब्रुवारी २०२६ रोजी माधुरी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती सासरच्यांनी माहेरच्यांना दिली. नातेवाईकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेही मिळून आली नाही. अखेर १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास औरंगपूर गावच्या शिवारातील एका शेततळ्यात माधुरीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

 

मुलीच्या मृत्यूने कोटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासरच्या सततच्या छळाला कंटाळूनच माधुरीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या फिर्यादीवरून आश्‍वी पोलिसांनी पती मनोज भास्कर अरगडे आणि सासू मिराबाई भास्कर अरगडे यांच्याविरुद्ध गु.र.न. १९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

 

या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आश्‍वी पोलीस करत आहेत.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed