संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील लोकवस्तीजवळ उभारण्यात येत असलेल्या ‘मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पा’ला (FSTP) विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे उपोषणकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे उत्तर तालुका कार्याध्यक्ष गोरख भानुदास जगताप यांची प्रकृती खालावली असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तळेगाव दिघे ग्रामपंचायतीच्या हद्दीत तळेगाव-चिंचोली रोडवर, लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालया शेजारी आणि नागझिरी वस्तीच्या अगदी जवळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘मैला गाळ प्रकल्प’ राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरणार असून, भविष्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प लोकवस्तीपासून लांब, निर्जन ठिकाणी हलवण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने लावून धरली आहे.

उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पासाठी सेप्टिक टँक आणि सांडपाण्याचा गाळ मैला वाहून नेणाऱ्या वाहनांद्वारे आणला जाणार आहे. याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास

दुर्गंधी आणि वायू प्रदूषण: रहिवासी भागात तीव्र दुर्गंधी पसरून श्वसनाचे आजार वाढतील. विषारी घटक भूगर्भातील पाण्यात मिसळल्याने पाण्याचे स्रोत दूषित होतील. उघड्यावर प्रक्रिया झाल्यास माश्या आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे रोग पसरतील.
शेतीवर परिणाम: गाळातील जड धातू आणि मायक्रोप्लास्टिकमुळे जमिनीचा कस कमी होईल.
या प्रकल्पाबाबत ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना वेळोवेळी लेखी सूचना देऊनही त्यांनी प्रकल्पाचे काम थांबवले नाही. ग्रामपंचायतीने या प्रकल्पाबाबत कोणती कायदेशीर कारवाई केली, याचे लेखी उत्तरही दिले नसल्याचा आरोप गोरख जगताप यांनी केला आहे. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२६ पासून संगमनेर पंचायत समितीसमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

शनिवारी पाचव्या दिवशी गोरख जगताप यांची शारीरिक स्थिती खालावली असून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासत आहे. “जोपर्यंत हा प्रकल्प लोकवस्तीतून स्थलांतरित केला जात नाही किंवा कायमचा बंद केला जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण आणि टाळे ठोक आंदोलन सुरूच राहील. उपोषणकर्त्याच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास तळेगाव दिघे ग्रामपंचायत प्रशासन, गट विकास अधिकारी आणि संबंधित प्रशासन सर्वस्व जबाबदार राहील,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी (अहिल्यानगर), पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनाही माहिती देण्यात आली असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


