राज्यसभेवर तिसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर रामदास आठवले भावूक

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 

 

राज्यसभेवर तिसऱ्यांदा वर्णी लागल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करण्यासोबतच विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली. “शिर्डीचा खासदार होण्याची माझी खूप इच्छा होती, मात्र आता मी राज्याचा (राज्यसभा) खासदार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासामुळे मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळणारा मी एकमेव खासदार असून, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. “एकेकाळी आमचे ९ खासदार होते, मात्र आता सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकतेचा आणि संविधानाचा संदेश घेऊन मी देशभर काम करणार आहे,” असा संकल्प त्यांनी यावेळी सोडला.

आपल्या पक्षाच्या विस्ताराबद्दल बोलताना आठवले म्हणाले की, “मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो, तरी मी आरपीआयचाच उमेदवार आहे. महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून पुण्यात आमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. आणखी दोन राज्यांत जर आमच्या पक्षाला यश मिळाले, तर आरपीआयला ‘राष्ट्रीय पक्षा’ची मान्यता मिळेल.” तसेच केंद्राचे आणि राज्याचे बजेट सर्वसामान्यांना न्याय देणारे असल्याचे सांगत त्यांनी आपल्या मंत्रालयाला कोट्यवधींचा निधी मिळाल्याची माहिती दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना आठवले म्हणाले की, “राहुल गांधी यांनी आजतागायत केवळ जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले आहे आणि आजही ते तेच करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश देशाचा विकास करणे आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणे हाच आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत बोलताना आठवले यांनी खळबळजनक मागणी केली. ते म्हणाले, “अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री असताना त्यांचे आणि व्हीएसआर मालकांचे चांगले संबंध असावेत, त्यामुळेच ते लग्नाला गेले असतील. मला अजित पवारांचा घातपात झाला असावा असे वाटत नाही, मात्र त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.

विधान परिषदेसाठी ज्योती वाघमारे यांच्या निवडी बद्दल म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नावे होती, त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. दलित पँथरच्या कार्यकर्त्या असलेल्या ज्योती वाघमारे यांच्या रूपाने आम्ही एक सक्षम महिला चेहरा दिला आहे.

भारताचे अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी चांगले संबंध असल्याचे सांगत आठवले यांनी नवीन व्यापार करारांमुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच भारत सरकार एआय तंत्रज्ञानात जगात आघाडी घेण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, राजाभाऊ कापसे, आशिष शेळके, बाबा राजगुरु , माणिक यादव , गणेश कदम , कैलास शेजवळ , कैलास कासार , जर्नाधन साळवे , गणेश साळवे  यांसह आरपीआयचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *