संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय चिमुकलीवर एका अज्ञात नराधमाने भरदिवसा ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानुष हल्ल्यात सहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा चेहरा गंभीररित्या भाजला असून, सध्या तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिला व शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
वडगाव पान परिसरात मंगळवारी (दि. १७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी आपली शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे निघाली होती. वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात तरुणाने तिला अडवले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने तिला थांबवले आणि काही समजण्यापूर्वीच तिच्या तोंडावर ॲसिड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक तातडीने धावून आले. मात्र, तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून पसार झाला होता.
या दुर्दैवी मुलीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या वडिलांचे छत्र आधीच हरवलेले असून आई अत्यंत गरीब आहे. शिक्षणाची ओढ असल्याने ही मुलगी वडगाव पान येथे आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होती. एका निरागस आणि पितृछत्र हरवलेल्या मुलीवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपीचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, परिसरात असलेल्या इतर मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर तरुण असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पठार भागातील रणखांब येथे नुकताच एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या १२ वर्षीय चिमुकलीवर ॲसिड हल्ला झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. “हा शिवरायांचा आणि सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. मुलींना आपण शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहोत, मात्र अशा दहशतीमुळे त्या कशा पुढे जातील?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेचा समाजातील सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. “अशा नराधमांना समाजात स्थान नाही. प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून आरोपीला फासावर लटकवावे,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि महिला संघटनांकडून केली जात आहे. पीडित मुलीची प्रकृती स्थिर राहावी आणि तिला न्याय मिळावा, यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
.
