मंगळवारी दोन मद्यपींमध्ये तुंबळ हाणामारी

एक जण गंभीर जखमी, पोलिसांच्या गस्तीची मागणी

आश्‍वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळा परिसरात सध्या तळीरामांसह टवाळखोरांनी मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला आहे. या परिसरात मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टोळक्यांमुळे शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आश्‍वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पाठीमागील बाजूस रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल आणि त्याला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा आहे. याच परिसरात विठ्ठल मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, बिरोबा महाराज मंदिर आणि कालिका माता मंदिर अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. परिसरातील पिठाची गिरणी, मेडिकल आणि जनरल स्टोअर्समुळे येथे महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, याच ठिकाणी काही मद्यपी टोळकी दिवसाढवळ्या उभी राहून मद्यप्राशन करतात आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. यामुळे येथील शैक्षणिक आणि धार्मिक पावित्र्य धोक्यात आले असून महिलांना या परिसरातून ये-जा करताना संकोच वाटत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन तळीरामांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच मोठ्या हाणामारीत झाले. या हिंसक झटापटीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरवस्तीत आणि शाळा भरलेली असताना झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


नुकत्याच संगमनेर तालुक्यात दोन शाळकरी मुलींवर झालेल्या हल्ल्याच्या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अशा टवाळखोरांचा वावर वाढणे ही चिंतेची बाब ठरत आहे. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शाळा सुटताना किंवा भरताना ही मुले तिथेच घुटमळत असतात. मद्यपींच्या शिवीगाळीमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे,” अशा भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केल्या आहेत. कोणतीही मोठी अप्रिय घटना घडण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने आश्‍वी बुद्रुक परिसरात, विशेषतः शाळा आणि मंदिरांच्या परिसरात गस्त वाढवावी आणि टवाळखोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *