संगमनेर । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या प्रतिष्ठित पुरस्काराचा भव्य गौरव सोहळा दि. २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते डॉ. गिते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ना. ॲड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट, महिला व बालविकास मंत्री ना. माधुरी मिसाळ, खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.


डॉ. गिते यांनी व्यसनमुक्ती चळवळीत उल्लेखनीय योगदान देत समाजजागृती, मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून असंख्य व्यक्तींना नवे जीवन दिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण व समर्पित कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्कारामध्ये १५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे.


डॉ. गिते यांना यापूर्वीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स तसेच इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या कार्याची नोंद झाली आहे. याशिवाय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सेवादूत पुरस्कार व राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कार यांसारख्या मानाच्या सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.


डॉ. गिते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *